करनाल (हरियाणा) : चीनी मंडी
हरियाणा सरकारच्या प्रदूषण नियंत्रण विभागाने भादसो साखर कारखाना प्रदूषणाच्या प्रश्नावरून सील केला आहे. या कारवाईमुळे कुरुक्षेत्र, करनाल आणि यमुनानगर विभागातील पाच हजार शेतकऱ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. प्रदूषण नियंत्रण विभागाने शेतकऱ्यांना तीन दिवसांची मुदत दिली आहे. त्यानंतर कारखाना कायमस्वरुपी बंद करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. सरकारच्या या निर्णयाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. अद्याप कारखान्याच्या कार्यक्षेत्रात १२ लाख क्विंटल ऊस शेतकऱ्यांच्या शेतांमध्येच आहे. शिवाय, कारखान्याकडून शेतकऱ्यांची सुमारे ७० कोटी रुपयांची येणे-बाकी आहे.
भादसो साखर कारखान्याशी पाच हजारहून अधिक शेतकरी संलग्न आहेत. भारतीय किसान युनियनचे प्रदेशाध्यक्ष रतनमान यांनी याप्रश्नी शेतकऱ्यांच्या हिताची लढाई लढण्याचा निर्णय जाहीर केला. भारतीय किसान युनियनच्या शिष्टमंडळाने प्रदेशाध्यक्ष रतनमान यांच्या नेतृत्वाखाली करनालचे जिल्हाधिकारी विनय प्रताप सिंह यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. भादसो साखर कारखाना बंद झाल्याने शेतकऱ्यांच्या झालेली बिकट अवस्था त्यांनी त्यांच्यासमोर मांडली. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कारखान्यावरील कारवाईमुळे या विभागातील शेतकरी उद्ध्वस्त होतील अशी भीती त्यांनी व्यक्त केली. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारखाना प्रशासनाला अनेकवेळा नोटिसा पाठविल्या. प्रदूषण थांबविण्याचे आदेश दिले. मात्र, कारखाना प्रशासनाने नोटिसांकडे दुर्लक्ष केले. सलग चार नोटिशींनंतरही स्थितीत सुधारणा न झाल्याने सरकारला कारखाना बंद करण्याचे पाऊल उचलावे लागले. शेतकऱ्यांचे हित समोर ठेऊन याबाबत निर्णय होईल असे जिल्हाधिकारी विनय प्रताप सिंह यांनी सांगितले.
यावेळी भाकियूचे प्रदेशाध्यक्ष रतनमान, जिल्हाध्यक्ष यशपाल राणा, श्यामसिंह मान, मेहताब सिंह कादियाना, सुरेंद्र बेनीवाल आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. भादसो साखर कारखान्याच्या परिसरात भाकियूतर्फे शेतकरी परिषद आयोजित केली जाणार आहे. त्यामध्ये पुढील रणनीती ठरवली जाईल असे कार्यकर्त्यांनी सांगितले.
डाउनलोड करे चीनीमंडी न्यूज ऐप: http://bit.ly/ChiniMandiApp