शाहाबाद : शेतकऱ्यांचा पूर्ण ऊस गाळपास गेल्यानंतरच शाहाबाद साखर कारखाना बंद होईल, असे प्रतिपादन हरियाणा शुगर फेडरेशनचे चेअरमन आणि शाहाबादचे आमदार रामकरण काला यांनी सांगितले. कारखान्याने आतापर्यंत ४६ कोटी रुपये किमतीची दीड लाख क्विंटल साखर परदेशात निर्यात केली आहे असे ते म्हणाले. कारखान्याच्या परिसरात उभारण्यात येणाऱ्या इथेनॉल प्लान्टच्या कामाचा आढावा घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
लवकरच कारखान्यात गूळ-साखर निर्मिती करणारे गूळ उत्पादन युनीट सुरू केले जाईल असे आमदार रामकरण म्हणाले. आपल्या सर्वोत्तम कार्यक्षमता आणि गुणवत्तेच्या जोरावर शहाबाद साखर कारखान्याने आतापर्यंत ३१ राष्ट्रीय पुरस्कार मिळवले आहेत.
कारखान्याचे मुख्य व्यवस्थापक विरेंद्र चौधरी यांनी सांगितले की, १३२ दिवसांमध्ये १५ कोटी रुपये किमतीची तीन कोटी ४२ लाख युनीट वीज निर्मिती कारखान्याने केली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा ४० लाख युनीट वीज अतिरिक्त तयार केली आहे. या १३२ दिवसांत कारखान्याने ५७ लाख क्विंटल उसाचे गाळप करून १७३ कोटी रुपये किमतीच्या पाच लाख ९० हजार क्विंटल साखरेचे उत्पादन केले. या गळीत हंगामात ७५ लाख क्विंटल ऊस गाळपाचे उद्दीष्ट आहे. २१ जुलैपर्यंत कारखाना ९० कोटी रुपये खर्च करून ६० केएलपीडी क्षमतेचा इथेनॉल प्लान्ट उभारत आहे. कारखान्याने १२ टक्के सरासरी उतारा मिळवला आहे. अशा प्रकारचा उतारा असलेला हा राज्यातील पहिला कारखाना आहे. शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ देणार नाही असे आश्वासन चौधरी यांनी यावेळी दिले.