सोलापूर : कर्नाटक सीमेलगत असलेल्या अक्कलकोट, दक्षिण सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांची यंदा उसाची पळवापळवी रोखताना दमछाक होणार आहे. कर्नाटकमधील कारखान्यांनी शेतकऱ्यांना ३,३०० रुपये अथवा त्यापेक्षा अधिक दराची हमी दिली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर ऊस कर्नाटक राज्यात गाळपास जाण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत कर्नाटक राज्यात कमी ऊस उपलब्ध आहे. तेथे पावसाअभावी ऊस उत्पादनात मोठी घट झाली आहे.
परिणामी ऊस मिळविण्यासाठी मल्टिस्टेट कारखान्यांनी आधीपासूनच नियोजन केले आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी सोलापूरसह इतर तालुक्यातील गावांमध्ये ऊसासाठी रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. सोलापूर जिल्ह्यात यंदा २ लाख ४० हजार ९५७ हेक्टर क्षेत्रावर ऊस पिक आहे. या भागातील काही कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना कर्नाटकमधील कारखान्यांनी जादा दराचे आमिष दाखवले आहे. गेल्यावर्षी आणि दोन वर्षांपूर्वीही कर्नाटकातील साखर कारखान्यांनी सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दर देऊन ऊस नेला होता.
अक्कलकोट, दक्षिण सोलापूर तालुक्यातील ऊसाचा यात समावेश होता. त्यावेळी सीमा भागातील सोलापूरच्या काही कारखान्यांनी या टोळ्यांना पळवून लावले होते. तसा संघर्ष यंदाही होण्याची शक्यता आहे. याबाबत अक्कलकोटचे अजय शिंदे गडकरी म्हणाले की, गतवर्षी जिल्ह्यानी २,२०० ते २,७०० रुपये हमीभाव दिला होता. यंदा कर्नाटकातील कारखाने ३३०० ते ३५०० रुपयांपर्यंत भाव देणार आहेत. त्यामुळे कर्नाटकातील कारखान्यांना ऊस पाठवणार आहे.