शामली : ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यातील खराब हवामानामुळे ऊसाच्या उताऱ्याला फटका बसला आहे. जिल्ह्यातील शामली आणि थानाभवान कारखान्यांनी २८ ऑक्टोबर तर ऊन कारखान्याने चार नोव्हेंबरपासून आपले गाळप सुरू करण्याची औपचारिक घोषणा केली आहे. जिल्ह्यात शामली, थानाभवन आणि ऊन कारखान्याच्या ऊस खरेदी केंद्रांवर वजन व्यवस्था करण्यात येत आहे. शामली कारखान्यात बॉयलर पूजन होत आहे. हवामान चांगले राहिले तर कारखाने ऑक्टोबरमध्ये सुरू होतील. अन्यथा गळीत हंगामास उशीर होण्याची शक्यता आहे.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, गेल्या वर्षी थानाभवन कारखाना सात नोव्हेंबर तर शामली कारखाना आठ नोव्हेंबर, ऊन कारखाना १४ नोव्हेंबर रोजी सुरू झाला होता. यावेळी शामली आणि थानाभवन कारखान्याने २८ ऑक्टोबर ही ताराखी निश्चित केली आहे. तर ऊन कारखाना ४ नोव्हेंबर रोजी सुरू होईल. मात्र, यंदा तयारी अपूर्ण आहे. दोन्ही कारखान्यांच्या बॉयलर पूजनाच्या कार्यक्रमाची घोषणा झालेली नाही. ऑक्टोबरमधील पाऊस आणि खराब हवामान यामुळे शेतकऱ्यांची डोकेदुखीही वाढली आहे. ऊसाचा उतारा कमी होत आहे. कारखान्यांच्या देखभाल, दुरुस्तीचे काम ७५ टक्के पूर्ण होत आहे. थानाभवन कारखान्याचे ऊस महाव्यवस्थापत अभिषेक श्रीवास्तव यांनी सांगितले की हवामान सामान्य असेल तर पुढील आठवड्यात बॉयलर पूजन केले जाईल. त्यानंतर ऊसाच्या उताऱ्याची चाचणी घेतली जाईल. ऊन कारखान्याचे महाव्यवस्थापक कुलदीप पिलानिया यांनी कारखान्याच्यावतीने ऊस खरेदीसाठी वजन काटे लावण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले.