कोल्हापूर : सन २०२३-२४ च्या गळीत हंगामात आलेल्या उसाला ३४०७ रुपये अंतिम ऊस दर देणार असल्याची घोषणा श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याने केली होती. त्यानुसार यापूर्वी प्रतिटन ३२०० रुपये अदा केले आहेत. आता गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर वाढीव ऊसदर २०७ पैकी १०० रुपयांचा पहिला हप्ता तसेच परतीच्या व बिन परतीच्या ठेवींवरील व्याज, तोडणी वाहतूकदारांचे कमिशन संबंधितांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत. कारखान्याचे अध्यक्ष तथा माजी आ. के. पी. पाटील यांनी ही माहिती दिली आहे.
अध्यक्ष पाटील म्हणाले की, गेल्यावर्षी कारखान्याने ९ लाख ५४ हजार ७७६ मे. टन उसाचे गाळप करून ११ लाख ९८ हजार ७०० क्विटल साखर पोत्यांचे उत्पादन केले. सरासरी १२.५५ टक्के उतारा मिळाला. कारखान्याने प्रतिटन ३२०० रुपयांप्रमाणे ३०५ कोटी ५२ लाख यापूर्वी दिले आहेत. संचालक मंडळाने प्रती टन २०७ रुपये वाढीव दर दोन हप्त्यात देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार पहिल्या हप्त्याची १०० रुपयांप्रमाणे होणारे ९ कोटी ५२ लाख रुपये ऊस पुरवठादारांच्या बँक खात्यास वर्ग केली आहे. ठेवीवरील व्याज रुपये ५९ लाख अदा केले आहे. तोडणी- वाहतूकदारांचे कमिशन डिपॉझिट रुपये १५ कोटी संबंधितांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येत आहे. यावेळी सर्व संचालक, व्यवस्थापकीय संचालक आर. डी. देसाई, कार्यकारी संचालक के. एस. चौगले आदी उपस्थित होते.