लातूर : लातूर तालुक्यातील बोडखा येथील शेतकरी ट्रॅक्टर चालक-मालक प्रदीप कदम व सारसा येथील वेल्डर धनंजय सोमासे यांनी कल्पकतेने ट्रॅक्टरचलीत रिव्हर्स फॉरवर्ड रोटरला गावठी जुगाड करून ऊस लागवड यंत्र तयार केले आहे. अंबाजोगाई तालुक्यातील धानोरा येथे मंगळवारी नॅचरल शुगरमार्फत रिव्हर्स फॉरवर्ड रोटरला जुगाड करून ऊस लागवडीचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना दाखवण्यात आले. कोणतीही मशागत न करता कमी वापसा असलेल्या शेतामध्ये ऊस लागवडीचे कामकाज सुलभ पद्धतीने करण्यासाठी ट्रॅक्टर चलीत रिव्हर्स फॉरवर्ड रोटरला गावठी जुगाड करून ऊस लागवड यंत्र तयार केले आहे. त्यातून मजूर टंचाईवर मात करण्याचा प्रयत्न या शेतकऱ्यांनी केला आहे.
शेतकऱ्यांचा ऊस लागवडीसाठी होणारा उत्पादन खर्च कमी करण्याच्या अनुषंगाने नॅचरल शुगरचे चेअरमन तथा कार्यकारी संचालक बी. बी. ठोंबरे, केन मॅनेजर मदन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली ऊस विकास अधिकारी शिवप्रसाद येळकर यांनी धानोरा येथे शेतीशाळा घेऊन शेतकऱ्यांना कमी खर्चात ऊस लागवड करण्यासाठी ‘रिव्हर्स फॉरवर्ड यंत्राला केलेले जुगाड’ कशा पद्धतीने फायदेशीर आहे, याची माहिती दिली. सध्या शेतीच्या मशागतीचा खर्च वाढला आहे. शेतामध्ये नांगरणी, मोगडणी आणि सरी तयार करण्यासाठी प्रती एकरी किमान पाच हजार रुपये खर्च लागतो. मजुरांच्या सहाय्याने ऊस लागवड करण्यासाठी प्रति एकरी सहा ते सात हजार रुपयांचे दर मजुरांकडून आकारण्यात येत आहेत. त्याऐवजी थेट रिव्हर्स फॉरवर्ड यंत्र चालवून सरी तयार केली जाते व याच यंत्रावर ऊस कांडी ठेवण्यासाठी दोन ट्रे आणि कापलेली ऊसकांडी जमिनीमध्ये सोडण्यासाठी मजुराला बसण्यासाठी सोय अशा पद्धतीचे जुगाड करून ऊस लागवडीचा यशस्वी प्रयोग करण्यात आला आहे.
साखर उद्योगाबाबत अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी Chinimandi.com वाचत राहा.