कुशीनगर : साखर कारखान्याने थकीत ऊस बिले त्वरित द्यावीत या मागणीसाठी विशुनपुरा विभागातील पकहा गावातील शेतकऱ्यांनी बुधवारी आंदोलन केले. कप्तानगंज साखर कारखाना प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाविरोधात त्यांनी घोषणाबाजी केली. जर एक आठवड्यात ऊस बिले देण्यास सुरुवात झाली नाही तर तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा या शेतकऱ्यांनी दिला.
जागरणमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, ऊसाचे पैसे मिळावेत यासाठी आंदोलन करीत असलेले उत्पादक शेतकरी सुधीर यादव, समीउल्लाह, इलियास, आसिर, हाफिज जुल्लाह, राकेश यादव, लक्ष्मी यादव, लालजीत कुशवाहा, संजय गोंड, सत्यदेव राय, लल्लन यादव, रामप्रताप यादव, रुस्तम अन्सारी, भोला गोंड, सतीश चंद, जनार्दन, इकबाल, नसरुल्लाह, नसरुद्दीन, राम शुभम, ओमप्रकाश आदींनी सांगितले की, या परिसरातील पकहा, पतिलार, घूर छपरा, कंठी छपरा, जरार, जमुआन, दोपही आदी अनेक गावातील शेतकरी आपला ऊस कप्तानगंज साखर कारखान्याला पाठवतात. गेल्या पूर्ण वर्षभरात ऊस बिले मिळालेली नाहीत. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात आहेत. साखर कारखाना प्रशासन बिले देण्याबाबत गंभीर नाही.
ऊसाचे पैसे मिळावेत यासाठी शासन, प्रशासनाकडून कारखान्यावर दबाव आणला जात असला तरी त्याकडे टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे आमची आर्थिक कोंडी झाली असल्याचे या शेतकऱ्यांनी सांगितले.