बिसलपूर : आपल्या पाचसूत्री मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी रढैता गावात क्रांतिकारी विचार मंचच्या बॅनरखाली प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. काही शेतकरी रविवारी रढैता गावाच्या मुख्य चौकात एकत्र आले. त्यांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केले. साखर कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी अद्याप शेतकऱ्यांची आधीची ऊस बिले दिलेली नाहीत, असा आंदोलकांचा आरोप आहे.
याबाबत अमर उजाला डॉट कॉमवर प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, भात आणि ऊस केंद्रांवर भ्रष्टाचार सुरू आहे, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. गेल्या महिन्यात झालेल्या भयंकर पावसामुळे पिकाचे मोठे नुकसान झाले असले तरी अद्याप शेतकऱ्यांना भरपाई मिळालेली नाही, असा आरोप यावेळी करण्यात आला. ज्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे, ती अत्यंत अपुरी असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
जवळपास पाऊण तासाच्या आंदोलनानंतर शेतकऱ्यांनी सरकारला एक आठवड्याची मुदत दिली. या मुदतीत मागण्यांचा विचार झाला नाही तर तहसील परिसरात प्रशासनाविरोधात बेमुदत धरणे आंदोलन सुरू करू असा इशारा देण्यात आला. आंदोलनाचे नेतृत्व क्रांतिकारी विचार मंचचे विभाग संरक्षक देव स्वरुप पटेल यांनी केले. या आंदोलनात सर्वेश गंगवार, रामवीर, राम सरण गंगवार, विशेष वर्मा, हरीशंकर, महेंद्र पाल, नारायणलाल, बाबूराम, भूपेंद्र सिंह, भारत सिंह, गया प्रसाद, भगवान सिंह, शेखर कोहली, राकेश कुमार, तौलाराम, अशोक कुमार, अनिल गंगवार आणि सुखलाल यांसह शेतकरी सहभागी झाले होते.