महेवागंज-खीरी : थकीत ऊस बिले देण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी खंभारखेडा साखर कारखान्याच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करून ऊस पुरवठा रोखला. दोन दिवस शेतकऱ्यांनी आंदोलन केल्यानंतर प्रशासनातील अधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली. याबाबत दोनदा बैठकीत तोडगा निघाला नाही. नंतर कारखान्याचे अधिकारी आणि शेतकऱ्यांमध्ये समझोता करण्यात आला. ३० नोव्हेंबरपर्यंत ऊस बिले दिली जातील असे लेखी आश्वासन मिळाल्यानंतरच शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. त्यानंतर कारखान्याचे गाळप सुरू झाले.
खंबारखेडा साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे गेल्या हंगामातील १८४ कोटी रुपये दिलेले नाहीत. हे पैसे मिळावेत यासाठी शेतकरी गेल्या अनेक महिन्यांपासून आंदोलन करीत आहेत. गेल्या दोन महिन्यापासून शेतकऱ्यांनी येथे धरणे आंदोलन सुरू केले आहे. पैसे न मिळाल्यास शारदानगरमध्ये जलसमाधी घेण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला होता. त्यावेळी ऊस विभाग तसेच प्रसाशनातील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची मनधरणी केली. काही ऊस बिले त्यावेळी देण्यात आली. नंतर पुन्हा बिले देण्यास टाळाटाळ होऊ लागली. १७ नोव्हेंबरपासून कारखान्याने गाळप सुरू केले. त्यासाठी इंटेंड जारी करण्यात आले. त्यापूर्वीच शेतकऱ्यांनी थकीत बिलाच्या वसुलीसाठी आंदोलनाची घोषणा केली होती. ऊस उत्पादकांनी कारखान्याच्या गेटवर आंदोलन सुरू केले. त्यानंतर अधिकाऱ्यांच्या मध्यस्तीने तोडगा काढण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन स्थगित केले असून कारखान्याला ऊस पुरवठा सुरू झाल्याने कारखानाही सुरू झाला आहे.