कोल्हापूर : ऊस तोडणी मजूर शेतात पाय ठेवण्या अगोदर शेतकऱ्यांकडून ‘खुशाली’च्या नावाखाली एकरी दोन किंवा तीन हजार रुपये वसूल करतात. अगोदरच विविध संकटांनी मेटाकुटीला आलेला शेतकरी आता उसतोड मजुरांच्या ‘खुशाली’ने वैतागला आहे. साखर कारखाने देखील शेतकऱ्यांच्या या प्रश्नाकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याने दाद मागायची तरी कोणाकडे ? असा सवाल शेतकऱ्यांतून उपस्थित केला जात आहे.
चार दिवसापूर्वी पुणे येथे झालेल्या बैठकीत ऊसतोडणी मजुरांना तब्बल ३४ टक्के तर मुकादमांच्या कमिशनमध्ये १ टक्का वाढ म्हणजे २० टक्के कमिशन देण्याचा निर्णय झाला आहे. गत वर्षीपेक्षा प्रति टनास ११५ रुपये जादा म्हणजे तोडणी मजुरांना प्रति टनास ४४० रुपये मिळणार आहेत. त्यामुळे आता तरी ‘खुशाली’ थांबणार का, असा सवाल शेतकऱ्यांमधून विचारला जात आहे.
ऊसतोड मजुरांना तोडणीचा दर ३४ टक्के वाढवून दिला आहे. तर, मुकादम कमिशन हे १९ टक्के होते, ते २० टक्के केले आहे. ही वाढ लक्षात घेतली तर प्रति टन १२५ रुपये तोडणी खर्च वाढणार आहे. ही वाढ शेतकऱ्यांच्या तोडणी वाहतूक खर्चातून दिली जाते. म्हणजे प्रति टन ११५ रुपये तोडणी वाहतुकीचा खर्च वाढल्याने एफआरपी ११५ रुपयांनी कमी मिळणार आहे. परंतु, या मजुरांची गावाकडून ने-आण करणे, कोयते, बांबू, वायर रोप, विमा, झोपडी उभारणे हा सर्व खर्च ऊस उत्पादक शेतकऱ्यांना करावा लागतो. गोपीनाथ मुंडे ऊसतोड मजूर महामंडळाला प्रति टन १० रुपये शेतकरी देणार आहेत. पण, हेच मजूर ‘खुशाली’साठी शेतकऱ्यांना वेठीस धरतात, त्या वेळी दुःख होते. ऊस उत्पादकांना विनंती आहे की, कोणीही ऊस तोडण्यासाठी पैसे देऊ नये आणि मजुरांनी शेतकऱ्यांना वेठीस धरू नये, असे आवाहन ‘आंदोलन अंकुश’चे अध्यक्ष धनाजी चुडमुंगे यांनी केले आहे.