ऊसै : पवन मावळातील शेतकऱ्यांपुढे नविनच संकट उभे ठाकले आहे. जानेवारी महिना सुरू झाला असला तरी अद्यापपर्यंत या परिसरातील ऊस तोडणीला साखर कारखान्यांनी सुरुवात न केल्यामुळे ऊसाच्या पिकाचे नुकसान होऊ लागले आहे.
ऊस तोडणीला उशीर होऊ लागल्यामुळे ऊसाला तुरे येत आहेत. ऊसाचे वय वाढत चालल्यामुळे ऊसाचे वजन वाढत आहे. या वर्षी पाऊस चांगला पडून, पिक चांगले येऊनही वेळेत तोडणी होत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
पवन मावळात तांदळाच्या पिकाबरोबर च ऊसाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. संत सहकारी साखर कारखान्याकडून दरवर्षी नोव्हेंबरपासूनच या परिसरातील ऊसाची तोडणी करुन कारखान्याला ऊस नेला जातो. या वर्षी मात्र जानेवारी महीना सुरु झाला तरी अद्यापपर्यंत पवन मावळातील ऊसतोड सुरु झालेली नाही.
कारखान्याचे कार्यकारी संचालक शेतकऱ्यांना ऊस तोडणी करण्याचे फक्त आश्वासन देत आहेत. पण याबाबत कार्यवाही होताना दिसत नाही. असे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुभाष धामणकर यांनी सांगितले. याबाबत कारखान्याला निवेदनही देण्यात आले आहे. या निवेदनावर मधुकर सावंत, बाळासाहेब धामणकर, सोपान गायकवाड, रामदास वळंजू, बाळासाहेब पिसाळ, अर्जुन कारके, शंकर धामणकर, बाळासाहेब बराटे यांच्या सह्या आहेत.