कोल्हापूर : महाराष्ट्राच्या सीमेवरील बेळगाव जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसमोर गळीत हंगाम उशिरा सुरु झाल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अती पावसाने झालेली उत्पादनातील घट तसेच साखर कारखान्यांनी जाहीर केलेला कमी दर यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. गतवर्षी २.८ लाख हेक्टर वरून लागवड क्षेत्रात ३ लाख हेक्टरपर्यंत वाढ झाली आहे. परंतु गळीत हंगाम उशिरा सुरू झाल्याने उसाची गुणवत्ता आणि उत्पादन कमी होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
कर्नाटकातील १६ जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या ७६ साखर कारखान्यांपैकी २९ साखर कारखाने बेळगाव जिल्ह्यात आहेत. त्याखालोखाल बागलकोट जिल्ह्यात १३, विजयपुरामध्ये ९, मंड्यामध्ये ५, बिदर जिल्ह्यात ५, कलबुर्गीमध्ये चार तर हावेरी जिल्ह्यात दोन कारखाने आहेत. कर्जाचा बोजा, नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यात झालेला जोरदार पाऊस, कामगारांची कमतरता आणि ऊस वाळण्याची भिती यंदाही ऊस उत्पादक शेतकऱ्यांना भेडसावत आहेत. कर्नाटक राज्यातील कारखाने दरवर्षी ५८ लाख ६ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करतात. महाराष्ट्रातून सुमारे १ हजार ३०० टोळ्या कर्नाटकात दरवर्षी येत असतात. परंतु सध्या निवडणुकीमुळे ऊस तोडणीसाठी मजूर आलेले नाहीत. ते आल्यावर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात बेळगाव जिल्ह्यातील साखर कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू होण्याची शक्यता आहे.