ऊस तोडणी मुकादमांकडून शेतकऱ्यांची फसवणूक, आमदारांची कारवाईची मागणी

कोल्हापूर : मराठवाडा, विदर्भ आदी भागातील मुकादमांकडून कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस वाहतूकदारांची फसवणूक केली जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. याबाबत काही शेतकऱ्यांनी कोल्हापूर दक्षिण मतदारसंघाचे आमदार ऋतुराज पाटील यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर पाटील यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील ऊस वाहतूकदारांच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली.

मराठवाडा, विदर्भ येथील ऊसतोड कामगार मोठ्या प्रमाणात कोल्हापूर, सांगली तसेच सातारा या साखर पट्ट्यातील जिल्ह्यांत ऊस तोडणीसाठी येतात. हे कामगार काही मुकादमांच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रात येत असतात. मात्र, गेल्या काही वर्षांपासून ऊस तोडणीसाठी मजुरांचा पुरवठा करतो, असे आश्वासन देऊन विदर्भ, मराठवाडा येथील मुकादमांकडून कोल्हापुरातील ऊस वाहतूकदारांची लाखो रुपयांची फसवणूक केली जात आहे. अशा फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसते. याबाबत काही शेतकरी तसेच वाहतूकदारांनी आमदार ऋतुराज पाटील यांची भेट घेऊन गाऱ्हाणे मांडले होते.

या पार्श्वभूमीवर आमदार पाटील यांनी जिल्ह्यातील ऊस वाहतूकदारांच्या शिष्टमंडळासोबत पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांची भेट घेऊन अशा पद्धतीने फसवणूक करणाऱ्या मुकादमांवर कायदेशीर कारवाईची मागणी केली. यावेळी एस. वाय. किल्लेदार, मारुती पाटील, अविनाश पाटील, दिगंबर पाटील, अनिल माने, युवराज पाटील, अमित पाटील, बाबासाहेब गोते, नितीन सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here