शेतकऱ्यांना दिलासा: मांजरा कारखान्याकडून पाचट कपातीचे २ कोटी ३५ लाख शेतकऱ्यांना परत

लातूर : मांजरा साखर कारखान्याने शेतकऱ्यांकडून ऊस पाचट कपातीचे घेतलेले २ कोटी ३५ लाख २० हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर परत जमा करण्यात आले आहेत. ऊस पुरवठादार शेतकऱ्यांनी बँक शाखेशी संपर्क साधावा व आपल्या खात्यावरील रक्कम घ्यावी, असे आवाहन विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखाना प्रशासनाने केले आहे.

मांजरा परिवाराचे मार्गदर्शक, कारखान्याचे चेअरमन माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी शेतकऱ्यांचे हित जोपासत हार्वेस्टरद्वारे ऊस तोड केलेल्या पाचट कपातीची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या खाती वर्ग करण्याचे आदेश कारखाना प्रशासनाला दिलेले होते. सध्या गणपती व महालक्ष्मीचा सण अगदी जवळ आल्याने मांजरा साखर कारखान्याने रक्कम खात्यावर जमा केल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.

ऊसतोड मजुरांची कमतरता भासत असल्यामुळे मांजरा साखर कारखान्याने सर्व उसाची तोडणी हार्वेस्टरद्वारे केली. अशा प्रकारे ऊस तोडणी करणारा हा महाराष्ट्रातीलच नव्हे तर देश पातळीवर पहिलाच साखर कारखाना ठरला आहे. हार्वेस्टरद्वारे ऊस तोडणी केलेल्या उसाच्या वजनातून पाचटाचे वजन कपात केले जाते.

गाळपास आलेल्या उसामध्ये पाचटाचे प्रमाण जास्त होते, त्यामुळे उसाच्या वजनातून पाचटाचे वजन कारखाना प्रशासनाने कपात केली होती. मात्र देशमुख यांनी हे पैसे परत करण्यास सांगितले. त्यामुळे एकूण २ कोटी ३५ लाख २० हजार इतकी रक्कम संबंधित ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली आहे.

साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here