पुणे :यंदाही मान्सूनची वाटचाल अडखळत सुरू असली तरी आगामी काळात कोकण पट्ट्यासह पुणे, सातारा या घाटमाथ्यावरील जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढेल अशी शक्यता आहे.सध्या राज्यात तुरळक ठिकाणी हलता ते जोरदार पाऊस कोसळत आहे.आज, बुधवारी कोकण आणि पुणे, सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.याशिवाय हवामान विभागाने विदर्भासाठी काही ठिकाणी वादळी पावसाचा येलो अलर्ट दिला आहे.
पावसाअभावी विदर्भात कमाल तापमान चाळिशीपार असून, मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील ब्रह्मपूरी येथे राज्यातील उच्चांकी ४१.९ अंश तापमानाची नोंद झाली.भंडारा, चंद्रपूर, नागपूर, वर्धा येथे पारा ४० अंशांपार आहे.नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) कोकण, मराठवाड्यात आणि मध्य महाराष्ट्राच्या बहुतांश भागात मजल मारली आहे.बुधवारी विदर्भात वाटचाल करताना अमरावती आणि चंद्रपूर पर्यंतच्या भागापर्यंत धाव घेतली आहे.त्यानंतर मात्र मॉन्सूनची वाटचाल जैसे थे असून, मंगळवारी (ता. १८) मॉन्सूनची कोणतीही प्रगती झालेली नाही. पावसाची उघडीप असलेल्या भागात ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका आणि उकाडा कायम आहे.