कोल्हापूर : तुलनेने कमी रिकव्हरी असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील सोमेश्वर साखर कारखान्याने दुसऱ्या हप्त्याच्या स्वरूपात एफआरपी पेक्षा ५६४ रुपये तर माळेगाव साखर कारखान्याने ४९४ रुपये दिले आहे. राज्यातील इतर काही कारखान्यांनीही दुसरा हप्ता दिला. मग साडेबारा टक्क्यांपुढे रिकव्हरी असल्या कारखान्यांना धाड भरली आहे का?, असा सवाल माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला. शिरोळ तालुक्यातील हेरवाड येथील जाहीर सभेत ते बोलत होते.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते शेट्टी यांनी कारखानदारांवर व सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, खताच्या दरामध्ये एका वर्षात २२ टक्के वाढ झाली. शेतकऱ्याचा उत्पादन खर्च, मजुरी व बियाणाचे दर वाढले आहेत. त्यामानाने उसाच्या एफआरपीच्या दरात फक्त शंभर रुपयांची वाढ झाली गेल्या पाच वर्षातील शेतकऱ्याचा उत्पादन खर्च आठशे रुपयांनी वाढलेला आहे. आम्ही उसाची कैफियत घेऊन निघालो आहोत. शेतकऱ्यांच्या हितासाठी पदयात्रेत सामील व्हा.
शेट्टी म्हणाले की, २०१४ साली भाजप सरकारने खतावरील सबसिडी कमी केली. शेतकऱ्यांचा विरोध पाहून नंतर सबसिडी थोडी वाढविली. आता खताची सबसिडी वाढविली म्हणून मोदींचा फोटो लावून जाहिरातबाजी सुरू आहे. यापूर्वीच्या सर्वच पंतप्रधानांनी खतावर सबसिडी दिली म्हणून खताचे दर नियंत्रणात होते. केवळ जाहिरातबाजी करून काहीही होणार नाही. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आक्रोश पदयात्रेवेळी हुपरीतील जवाहर साखर कारखान्याच्या परिसरात साखर वाहतूक करणाऱ्या एका ट्रक चालकाला धक्काबुक्कीचा प्रकार घडला.