उत्तर प्रदेश : शामली साखर कारखान्याला ऊस न पाठविण्याचा शेतकऱ्यांचा निर्णय

शामली : शेतकऱ्यांची ऊस बिले थकविणाऱ्या शामली साखर कारखान्याला आगामी गाळप हंगामात ऊस न पाठविण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे. याबाबत शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली लिलौन गावात बैठक झाली. या बैठकीला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या समस्यांचा पाढाच वाचला. त्यानंतर ऊस सचिवांना शेतकऱ्यांनी निवेदन देऊन बैठकीतील निर्णयाची माहिती दिली.

लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, शामली साखर कारखान्याकडे शेतकऱ्यांची २६४ कोटी रुपयापेक्षा जादा ऊस बिले थकीत आहेत. कारखान्याने ऊस बिले थकविल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अनेक शेतकऱ्यांकडे कुटूंबातील लोकांच्या वैद्यकीय उपचारासाठीही पैसे नसल्याची स्थिती आहे. पैशाअभावी शेतीसाठी किटकनाशके, खते वेळेवर खरेदी करणे शक्य झालेले नाही. त्यामुळे आगामी गळीत हंगामात कारखान्याला ऊस न पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला.

यावेळी शेतकऱ्यांनी खतौली आणि तितावी साखर कारखान्याची ऊस खरेदी केंद्रे देण्याची मागणी केली. बैठकीला संजीव लिलौन, रविंद्र सिंह, अरविंद कुमार, अशोक कुमार, मंगा, बिटटू, यासिन, श्रीपाल सिंह, बीरसेन, मनोज मलिक, विनय कुमार, ब्रजपाल शर्मा आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here