मुजफ्फरनगर : भारतीय किसान युनियनने बायवाला चौकी, फुगाना आणि शाहपूरमध्ये आंदोलन केले. सकाळी अकरा वाजल्यापासूनच भाकियूचे कार्यकर्ते मेरठ-कर्नाल महामार्गावरील फुगाना, बायवाला चौक व शहापूरमधील मन्सूरपूर चौकात आंदोलन स्थळी एकत्र आले. शेतकरी कोणत्याही परिस्थितीत बजाज साखर कारखान्याला ऊस पाठवणार नाहीत.
कारखान्याकडे कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे सरकारने ऊस पाठवण्यासाठी दुसऱ्या साखर कारखान्याचे केंद्र द्यावे अशी मागणी भाकियू अध्यक्ष चौ. नरेश टिकेत यांनी केली. यावेळी भाकियूचे तालुकाध्यक्ष अनुज बालियान व विभाग अध्यक्ष संजीव पंवार, विकास त्यागी, ओमपाल मलिक आदी उपस्थित होते.
जागरणमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, मोरनामध्ये राष्ट्रीय संयुक्त किसान मोर्चाच्या आवाहनानंतर भारतीय किसान युनियनचे जिल्हाध्यक्ष योगेश शर्मा, ब्लॉक अध्यक्ष विकास कुमार, पुष्पेंद्र, सतबीर बाबा, हवासिंह, पम्मा सरदार, सरदार अमीर सिंह, विकास चौधरी, कक्कू शर्मा, मदन चेअरमन, बिट्टू छछरौली, पिंदर, श्यामवीर, महेंद्र सिंह, अशोक कुमार आदींसह शेकडो कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. कार्यकर्त्यांनी चौधरी चरणसिंह चौकात आंदोलन केले. सरकार भांडवलशाहीला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप योगेश शर्मा यांनी केला. भाकियूच्यावतीने विभागीय स्तरावर आयोजित आंदोलनावेळी नायब तहसीलदार राजकुमार सिंह यांना कार्यकर्त्यांनी निवेदन दिले. मंडल अध्यक्ष नवीन राठी यांनी शेतकरी गेल्या ३६ वर्षांपासून आंदोलन करीत आहेत. मात्र, त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे सांगितले. खतौलीमध्येही शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन केले.