यशवंत कारखाना निवडणुकीत शेतकरी विकास आघाडीची बाजी

पुणे : यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत रात्री उशिरापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार शेतकरी विकास आघाडीने बाजी मारली आहे. सहकार क्षेत्रातील दोन्ही दिग्गजांचे गट निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने रविवारी उरुळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालयात होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत सहा गटांमधून अण्णासाहेब मगर रयत सहकारी पॅनल व अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी या दोन प्रमुख पॅनलसोहबतच अपक्ष उमेदवारही आपले नशीब आजमविण्यासाठी उभे ठाकले होते.

हवेलीचे ज्येष्ठ नेते माधव काळभोर, हवेली, बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर, बाजार समितीचे विद्यमान संचालक रोहिदास उंद्रे यांच्या प्रमुख नेतृत्वाखालील ‘अण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनल’, तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रताप गायकवाड, माजी सभापती व विद्यमान संचालक प्रकाश जगताप, बाजार समितीचे विद्यमान संचालक प्रशांत काळभोर, माजी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब चौधरी यांच्या नेतृत्वाखालील ‘अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी’ या दोन पॅनलपैकी कोणते पॅनल निवडणुकीत बाजी मारेल, याची उत्सुकता मोठ्या प्रमाणात लागली होती.

रात्री उशिरापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार या निवडणुकीत अण्णासाहेब मगर रयत सहकारी पॅनलच्या ‘ब’ वर्गातून सागर काळभोर व गट क्रमांक ३ मधून नवनाथ काकडे विजयी झाले आहेत. अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीमधून एक नंबर गटातून सुनील कांचन, संतोष कांचन व सुशांत दरेकर, गट क्रमांक २ मधून शशिकांत चौधरी, विजय चौधरी व ताराचंद कोलते, गट क्रमांक ३ मधून मोरेश्वर काळे, योगेश काळभोर असे एकूण ८ उमेदवार विजयी झाले. थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची मतमोजणी उरुळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालयात रविवारी (दि.१०) सकाळपासून सुरू आहे. या निवडणुकीतील सर्वांत पहिला सकाळीच निकाल हाती आला होता. यामध्ये कारखान्याच्या “ब” वर्गात अण्णासाहेब मगर रयत सहकारी पॅनलचे उमेदवार सागर अशोक काळभोर हे २०२ मतांनी विजयी झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here