सातारा : ऊस तोडणी कामगारांच्या मजुरीच्या दरात ३४ टक्के व मुकादमांच्या कमिशनमध्ये १ टक्का अशी तब्बल ३५ टक्के वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे ऊस तोडणी व वाहतुकीत १२० रुपयांची वाढ झाली आहे. हा आर्थिक भुर्दंड ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सोसावा लागणार आहे. सध्या कारखान्यांनी ३१०० रुपये दर दिला असताना त्यातूनही आता वाढीव मजुरीची कात्री लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनाच वाढीव आर्थिक फटका सोसावा लागणार आहे.
सध्या ऊस तोडणी मजुरांना प्रती टन २७४ रुपये आणि ऊस तोडणी मजुरीवर मुकादमांना १९ टक्के कमिशन मिळते. ऊस उत्पादकांच्या बिलातून साखर कारखाने ३२७ रुपये वसूल करून घेतात. ऊस तोडणी मजुरांनी संप केल्यामुळे मध्यंतरी काही काळ तोडण्या खोळंबल्या होत्या. आ. पंकजा मुंडे व खा. शरद पवार यांच्या सहमतीने मजुरांना ३४ टक्के वाढ देण्याचे ठरले. ही वाढ शेतकऱ्यांच्या एफआरपीला कात्री लावूनच दिली जाणार आहे. नव्या दरानुसार मजुरांना प्रतिटन ३२७ रुपये मजुरी मिळणार आहे. मुकादमांना २० टक्के दराने कमिशन मिळणार आहे. परिणामी खर्च ३२७ वरून थेट ४४१ रुपये होणार आहे. ही वाढ प्रतिटन १२० रुपये आहे. याशिवाय, ऊस तोडणी मजूर शेतकऱ्यांकडून एकरी २ ते ३ हजार रुपये घेत आहेत. त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत.