पिलीभीत : साखर कारखान्याकडून बिले देण्यास होत असलेल्या उशीरामुळे बरखेडा येथील शेतकऱ्यांचा राग अनावर झाला आहे. आपण पुरवठा केलेल्या उसाचे पैसे देण्याच्या मागणीसाठी त्यांनी बजाज साखर कारखान्यासमोर आंदोलन सुरू केले आहे. ABP न्युजवर प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतरही साखर कारखाना प्रशासन बिले देण्यात अपयशी ठरले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कारखाना बंद पाडत आगामी काळात ऊस पुरवठा रोखण्याचा इशारा दिला आहे.
कारखाना प्रशासनाने आर्थिक तंगीमुळे ऊस बिले देण्यापासून आपले हात वर केले आहेत. कारखान्याच्या या निर्णयानंतर शेतकऱ्यांनी बेमुदत काळासाठी धरणे आंदोलन सुरू केले आहे. साखर कारखान्याकडे गेल्या हंगामातील कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे. शेतकऱ्यांनी बजाज साखर कारखान्यात गोंधळ घालत कामकाज बंद पाडले आणि ऊस बिले न दिल्याबद्दल इशारा देत कारखान्यातच मंडप उभारून बेमुदत काळासाठी आपले आंदोलन सुरू केले आहे.