कोल्हापूर : यंदाच्या गळीत हंगामात अद्यापही बऱ्याच साखर कारखान्यांचे आडसाली ऊस लागणीचे गाळप आटोक्यात येईनासे झाले आहे. शेतकऱ्यांना या विलंबाचा फटका बसला आहे. या उसाचा खोडवा राखण्याबाबतही संभ्रमावस्था निर्माण झाल्याचे चित्र या परिसरात दिसून येत आहे. एकीकडे १२-१३ महिन्यांच्या खोडवा उसाचे गाळप, तर १७-१८ महिन्यांच्या आडसाली लागणीचे गाळप एकाच वेळी होत असल्याचे विचित्र चित्र पहावयास मिळत आहे.
यंदाचा गळीत हंगाम सुरू होण्यास झालेला विलंब व त्यामुळे ऊस तोडणी यंत्रणेत आलेला विस्कळीतपणा यामुळे जिल्ह्यातील बऱ्याच साखर कारखान्यांत ऑगस्ट, सप्टेंबर २०२२ मध्ये आडसाली लागण झालेल्या उसाचे गाळप १७-१८ महिन्यानंतर सुरू आहे. कारखान्यांनी यांत्रिक ऊस तोडणीसाठी क्रमपाळीत शिथिलता दिली असली तरी आडसाली ऊस पडलेला असल्यामुळे शेतकरी या उसासाठी यांत्रिक तोडणी घेण्यासाठी उत्सुक नाहीत. त्यामुळे मार्च-एप्रिलमध्ये जाणारा जादा रिकव्हरी असणारा खोडवा ऊस यांत्रिक तोडणीने त्वरित गळितास नेण्याची संधी कारखान्यांना मिळाली आहे.