निपाणी (बेळगाव) : साखर कारखाने ऊस उत्पादकांचे आर्थिकदृष्ट्या शोषण करीत आहेत. अशा प्रकाराला खतपाणी घालण्याचे काम शासन व राज्यकर्ते यांच्याकडून होत आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाभागातील साखर कारखान्यांकडून देण्यात येणाऱ्या ऊस दरात तफावत आहे. ही तफावत दूर व्हायला हवी. कर्नाटकमधी शेतकऱ्यांनाही महाराष्ट्राप्रमाणे ऊस दर मिळणे गरजेचा आहे असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक व माजी खा. राजू शेट्टी यांनी केले. येथील नगरपंचायतीच्या भव्य पटांगणावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे आयोजित ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
जयसिंगपूर येथे होणाऱ्या ऊस परिषदेच्या पार्श्वभूमीवर आयोजित ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या जनजागृती मेळाव्यात शेट्टी यांनी सीमाभागातील शेतकऱ्यांनी संघटित होऊन तीव्र लढा उभारावा. तरच ऊस उत्पादकांना महाराष्ट्राच्या धर्तीवर उसाला दर मिळेल, असे मत मांडले. जयसिंगपूर येथे २५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या ऊस परिषदेला सीमाभागातील ऊस उत्पादकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले. शेतकरी नेते राजेंद्र गड्ड्याण्णावर, सामाजिक कार्यकर्ते अण्णासाब कठारे, निवृत्त मुख्याध्यापक एम. बी. उदगावे, अजित करव, आदिनाथ बिंदगे, अशोक कुडचे, राजू मगदूम, काकासाब पाटील, राजेंद्र करव, अभय करोले, प्रकाश पाटील, राजेंद्र चिंचवाडे, सचिन कवटगे, बाबासाब चौगुले, प्रकाश चौगुले, राजू पाटील आदी उपस्थित होते.