सांगली : सांगली जिल्ह्यातील कोणत्याही सहकारी साखर कारखान्याने पहिली उचल जाहीर केलेली नाही. कायद्याने एफआरपी १४ दिवसात देणे बंधनकारक असतानाही, कारखानदार गप्प आहेत. उसाचा पहिला हप्ता न मिळाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत. गळीत हंगाम सुरू होऊन ५० दिवस होत आले तरीही पहिली हप्ता न मिळाल्याने शेतकरी अस्वस्थ झाले आहेत.
सांगली जिल्ह्यातील कारखानदारांनी कोल्हापूरप्रमाणे दर द्यावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन केले. मात्र कारखानदारांनी आंदोलनाकडे दुर्लक्ष करत ऊस गाळप पूर्ण क्षमतेने सुरू ठेवले. साखरेचे दर चढे असल्याने कारखानदार पहिली उचल प्रतिटन ३५०० रुपयांपर्यंत देतील, अशी अपेक्षा होती. मात्र, कारखानदारांनी एकजूट दाखवत ३१०० रुपयांचा पहिला हप्ता देण्याचे जाहीर केले. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने संघर्ष सुरू ठेवल्यानंतर दोन बैठका झाल्या. आता दराबाबत कारखानदार २६ डिसेंबरपर्यंत निर्णय घेणार आहेत.