सोलापूर : साखर कारखान्यांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कठोर भूमिका घेतली. मात्र दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा सरकारच्या हमीबाबत निर्णय फिरवला. राज्य सरकारच्या अशा आडमुठ्या धोरणांमुळे साखर कारखानदार मोठे झाले आणि शेतकरी संकटात आहेत, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी पंढरपूर दौऱ्यावर असताना केली.
राजू शेट्टी म्हणाले की, अजित पवार यांनी साखर कारखान्याच्या थकहमीबाबत योग्य भूमिका घेतली होती. कारखान्याच्या कर्जाची हमी शासनाने का घ्यावी? हा मुद्दा रास्त आहे. खाजगी कारखाने स्वतःच्या बळावर कर्ज फेडतात. मग सहकारी कारखान्यांनाच कशाला शासनाची हमी हवी असा सवाल त्यांनी केला. साखर कारखानदारांचा हेतू स्वच्छ नाही. त्यांना कारखाना मोडून खायचा आहे. त्यामुळे वारंवार हमी लागते अशी टीका शेट्टी यांनी केली. शेट्टी यांनी पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ कारखान्याच्या जीएसटीबाबत प्रश्न उपस्थित केला. एवढी रक्कम थकविण्यास सरकारचा आशीर्वाद होता का ? असा सवाल त्यांनी केला.