लखनऊ: उत्तर प्रदेश सरकारने गेल्या चार वर्षात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सर्वाधिक पैसे मिळवून दिले असा दावा ऊस विभागाचे मंत्री सुरेश राणा यांनी केला. सरकारने समाजातील प्रत्येक घटकासाठी कार्य केले आहेत. सरकारकडून गेल्या चार वर्षात ४ लाख नोकऱ्या दिल्या गेल्या आहेत असा दावा त्यांनी केला.
उत्तर प्रदेश सरकारला उद्या, शनिवारी चार वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर बोलताना मंत्री राणा म्हणाले, गेल्या चार वर्षात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सर्वाधिक पैसे मिळाले. सरकारने बंद असलेले २४ हून अधिक कारखाने सुरू केले आहेत. मात्र, अद्याप काही शेतकऱ्यांचे पैसे मिळायचे आहेत. ते लवकर देण्यासाठी प्रयत्न केले जातील. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली सरकार चांगली कामगिरी करत आहे. सरकारकडे विकासाचा आणि शेतकरी हिताचा कोणताही अजेंडा नाही. नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या मार्गाने राज्यात कामकाज सुरू आहे. विकासाचे नवे आयाम सरकारने पार केले आहेत. रस्ते, पाणी, विज, शेतकरी, कायदा सुव्यवस्था, महिलांचा सन्मान अशा सर्व स्तरावर सरकार गतीने पुढे गेले आहे.
गेल्या चार वर्षात ५ लाक कोटींची गुंतवणूक राज्यात झाली आहे असे सांगून मंत्री राणा म्हणाले, कायदा-सुव्यवस्थेत सुधारणा ही महत्त्वाची बाब मानली पाहिजे. समाजवादी पार्टी, बसपाच्या सत्ताकाळात गुन्हेगारी प्रवृत्तींना राजकीय बळ मिळत होते. आम्ही हे चित्र बदलले. एअर कनेक्टिव्हिटी वाढवली. रस्ते जोडले. पूर्वांचल, बुंदेलखंड एक्स्प्रेस वे, गोरखपूर लिंक एक्स्प्रेस वे, गंगा एक्प्रेस वे अशी विकासाची गती निर्माण केली. नऊ एअरपोर्ट विकसित केले.
गेल्या चार वर्षात ३० हजार कोटी रुपये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळाले आहेत. किसान सन्मान योजनेतून २ कोटी ४० लाख शेतकऱ्यांना २७००० कोटी रुपये मिळाले आहेत. गेल्या चार वर्षात शेतकऱ्यांना १ लाख २६ हजार कोटी रुपये मिळाले आहेत. ज्यांनी शेतकऱ्यांवर काठ्या आणि गोळ्या चालवल्या ते आज दिखावूपणा करीत असल्याची टीका मंत्री राणा यांनी केली. कृषी कायद्यांबाबत सरकार संवाद साधत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्या निर्देशानंतर शेतकऱ्यांशी बारा वेळा बैठका प्रशासनाने चर्चा केली. त्यामुळे संवादातून कृषी विधेयकांना असलेला विरोध दूर होईल असे मंत्री राणा यांनी सांगितले.