नागपूर : शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया येत्या दोन ते तीन महिन्यात पूर्ण करणार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. हिवाळी अधिवेशनानिमित्त नागपुरात अनौपचारिक गप्पांदरम्यान अजित पवार यांनी शेतकरी कर्जमाफीबाबत हा खुलासा केला आहे.
शेतकरी कर्जमाफीवरून विरोधकांनी सत्ताधारी महाविकास आघाडीच्या सरकारला धारेवर धरले असताना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी याबाबत हा अनौपचारिक खुलासा केला.
फडणवीस सरकारच्या काळात शेतकर्यांना कर्जमाफी देण्याची प्रक्रिया राबवली गेली. परंतु ऑनलाईन प्रक्रियेच्या गोंधळात अद्यापही निम्म्यापेक्षा अधिक शेतकरी कर्जमाफी प्रक्रियेपासून वंचित राहिले आहेत. कर्जमाफी देताना आधार लिंक करुन कर्जमाफी देता येईल का याचीही चाचपणी सुरु असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले आहे.
राज्यातील शेतकर्यांना कर्जमुक्त करण्यासाठी 35 हजार 800 कोटी रुपयांची गरज भासणार आहे. राज्यात सध्या महाराष्ट्र विकास आघाडीच सरकार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली , शेतकरी कर्जमाफीकडे तमाम शेतकरी वर्गाचे लक्ष लागून राहिले आहे.
केंद्र सरकारच्या मदतीशिवाय ही कर्जमाफी देण्याचे सूतोवाच यापूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी विविध खात्यांसोबत कर्जमाफीबाबत आढावाही घेतला आहे. त्यामुळे उध्दव ठाकरे मुख्यमंत्री या नात्याने कर्जमाफीची घोषणा कधी करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.