बुढाना : थकीत ऊस बिले मिळावीत या मागणीसाठी धरणे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी भैसाना साखर कारखान्याच्या ऊस विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकले. हा प्रश्न लवकर न सोडवल्यास २३ ऑगस्ट रोजी ट्रॅक्टर मोर्चा आणि महापंचायत आयोजित करण्याची घोषणा करण्यात आली. या महापंचायतीस भाकियूचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत उपस्थित राहणार आहेत.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, थकीत ऊस बिले देण्यासह विविध १० मागण्यांसाठी भाकियूच्या कार्यकर्त्यांनी ३० मेपासून साखर कारखान्याच्या मुख्य गेटवर आंदोलन सुरू केले आहे. शेतकऱ्यांनी बिले न मिळाल्याने ऊस विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकले. त्यानंतर बुधवारी सकाळी कारखान्याचे उपाध्यक्ष जंग बहादूर तोमर, ऊस व्यवस्थापक शिवकुमार त्यागी आणि प्रदीप जैन हे आंदोलनस्थळी पोहोचले. त्यांनी शेतकऱ्यांना थकीत ऊस बिलाच्या सद्यस्थितीची माहिती दिली.
कारखान्याच्या अधिकाऱ्यांच्या विनंतीवरून शेतकऱ्यांनी ऊस विभागाच्या कार्यालयाला लावलेले कुलूप उघडले. कारखान्याच्या आवारात महापंचायत आयोजित करण्यात येणार असल्याचे भाकियूचे तातुकाध्यक्ष अनुज बालियान आणि विभाग अध्यक्ष संजीव पनवार यांनी सांगितले. आंदोलनस्थळी विकास त्यागी, प्रवीण, राजबीर, विपिन, धीरसिंग, प्रवेंद्र, मोनू सैनी, इसरार, तमसीर आदी उपस्थित होते.