मेरठ : भारतीय किसान युनियनशी (बिकेयू) संलग्न महिला कार्यकर्त्यांनी गुरुवारी सिसौली (मुजफ्फरनगर) मध्ये आयोजित एक दिवसीय महिला पंचायतीमध्ये शेतकऱ्यांशी संलग्न मुद्यांबाबत आणि आंदोलनातील त्यांच्या भूमिकेबाबत चर्चा केली. महिला नेत्यांनी भविष्यात सक्रीय रुपात कृषी आंदोलनात सहभागी होण्याची शपथ घेतली. अनेक जिल्ह्यांतील महिला कार्यकर्त्यांसह महिला पंचायतीमध्ये बिकेयूचे वरिष्ठ नेते नरेश टिकैत, त्यांची पत्नी मनू, राकेश टिकैत आणि त्यांची पत्नी
सुनीता सहभागी झाल्या. या कार्यक्रमात सहभाग घेणाऱ्या इतर नेत्यांमध्ये बिकेयू महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष केतकी सिंह आणि महिला विंगच्या पश्चिम युपी प्रमुख बबली त्यागी सहभागी होत्या.
सभेमध्ये संवाद साधताना बबली त्यागी यांनी भ्रूण हत्या, नशेबाजी आणि वृक्षारोपणाच्या पद्धतींविषयी जनजागृती केली. त्यांनी ऊस थकबाकीचा मुद्दाही उपस्थित केला. त्या म्हणाल्या की, साखर कारखान्यांनी वेळेवर ऊस बिले देण्याची गरज आहे. आम्ही थकीत ऊस बिलांबाबत आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. महिलांची यामध्ये सक्रिय भागीदारी असायला हवी. त्यांनी दावा केला की, उत्तर प्रदेशच्या पश्चिम विभागात महत्त्वपूर्ण प्रभाव असलेल्या खाप पंचायती महिलांबाबत आपली भूमिका मवाळ बनवत आहेत. आणि त्यांना सामाजिक मुद्यांवर मोठी भूमिका घेण्यास प्रोत्साहन देत आहेत. यांदरम्यान, बिकेयू गाझियाबादच्या अध्यक्षा ममता चौधरी आमि मुझफ्फरनगरच्या अध्यक्षा सोनिया सैनी यांनी उत्तर प्रदेशातील महिला कार्यकर्त्यांना संघटना मजबूत करण्याचे आवाहन केले. त्यांनी महिलांना २६ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या लखनौतील आंदोलनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले.