सातारा : य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने ३७ शेतकरी पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटच्या वतीने आयोजित केलेल्या ‘ऊस शेती ज्ञानयाग’ प्रशिक्षणामध्ये सहभागी होण्यासाठी रवाना झाले आहेत. कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी शिबिरात सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना शुभेच्छा दिल्या. शिबिरात माती परीक्षण, अधिक ऊस उत्पादनासाठी खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, खोडवा व्यवस्थापन, ऊती संवर्धित रोपे, बियाणे मळा, रोग व कीड नियंत्रण व्यवस्थापन याची माहिती मिळणार आहे.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटतर्फे शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, उसाच्या प्रति एकरी उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना दरवर्षी प्रशिक्षण दिले जाते. कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाने कार्यक्षेत्रातील ३७ शेतकऱ्यांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. प्रशिक्षणास जाणाऱ्या सभासद शेतकऱ्यांशी डॉ. भोसले यांनी संवाद साधला.
यावेळी उपाध्यक्ष जगदीश जगताप, संचालक निवासराव थोरात, संजय पाटील, संभाजीराव पाटील, धोंडीराम जाधव, बाजीराव निकम, शिवाजी पाटील, जे. डी. मोरे, कार्यकारी संचालक राम पाटील, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सहाय्यक दुय्यम निरीक्षक रुपाली क्षीरसागर, बहेचे माजी उपसरपंच मनोज पाटील, वैभव जाखले, जनरल मॅनेजर टेक्निकल) बालाजी पबसेटवार, ऊसविकास अधिकारी पंकज पाटील आदी उपस्थित होते. पाच दिवसीय प्रशिक्षण शिबिरात हजारो शेतकरी सहभागी होणार आहेत.