चंदीगड : पंजाब सरकारने आजपासून सुरू होणाऱ्या उसाच्या गाळप हंगामासाठी उसाच्या राज्य सहमती किंमतीत (एसएपी) प्रति क्विंटल १० रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे लवकर पक्व होणाऱ्या उसासाठी ४०१ रुपये प्रती क्विंटल एसएपीसह पंजाबमधील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देशात सर्वाधिक दर मिळणार आहे. तर उसाच्या मध्यम आणि उशिरा परिपक्व होणाऱ्या वाणांसाठी ३९१ रुपये प्रती क्विंटल एसएपी निश्चित करण्यात आला आहे. २०२३-२४ मध्ये देण्यात आलेल्या ३८१ रुपये प्रती क्विंटल एसएपीपेक्षा हा दर जास्त आहे.
परंतु राज्यातील एकूण उत्पादित उसाच्या ७० टक्के गाळप करण्याची क्षमता असलेल्या राज्यातील खासगी साखर कारखान्यांना हा निर्णय फारसा पसंतीला आलेला नाही. त्यांनी सांगितले आहे की, ते शेतकऱ्यांना प्रती क्विंटल ३३९.५० रुपये देतील, तर राज्य सरकार एसएपीची उर्वरित रक्कम ६१.५० रुपये प्रती क्विंटल या दराने शेतकऱ्यांना देऊ शकते. मध्यम पक्व होणाऱ्या आणि उशीरा पिकणाऱ्या वाणांसाठी, खाजगी साखर कारखाने शेतकऱ्यांना प्रती क्विंटल ३२९.५० रुपये देतील.
राज्यातील सहा खाजगी साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींनी/मालकांनी गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री भगवंत मान यांच्याशी झालेल्या बैठकीत घाऊक तसेच किरकोळ साखरेचे दर गेल्यावर्षीच्या तुलनेत १५० रुपये प्रती क्विंटल कमी असल्याचा दावा केला होता. त्यानंतर खासगी साखर कारखान्यांमध्ये गाळपासाठी ऊस आणणाऱ्या शेतकऱ्यांना थेट ६१.५० रुपये प्रती क्विंटल देण्याचे मुख्यमंत्र्यांनी मान्य केले.
राणा शुगर्सचे राणा इंदर प्रताप सिंग यांनी ट्रिब्यूनशी बोलताना सांगितले की, यावर्षी महाराष्ट्र आणि कर्नाटकात ऊसाचे जास्त उत्पादन झाल्यामुळे घाऊक साखरेचे दर प्रति क्विंटल ३,७०० रुपयांपर्यंत घसरले आहेत. ते म्हणाले, आम्ही पंजाबमध्ये अजूनही ऊस उत्पादकांना केंद्र सरकारने अधिसूचित केलेल्या ३१५ रुपये प्रति क्विंटलच्या किमतीपेक्षा जास्त किंमत देत आहोत. राज्यात सलग तिसऱ्या वर्षी उसाच्या एसएपीमध्ये वाढ करण्यात आली आहे. गेल्यावर्षी त्यात प्रतिक्विंटल ११ रुपयांनी वाढ करण्यात आली होती.
यंदा उसाचे क्षेत्र ५ हजार हेक्टरने वाढून एक लाख हेक्टर झाले आहे. यावर्षी ७०० लाख क्विंटल उसाचे गाळप अपेक्षित असून, त्यापैकी ५०० लाख क्विंटल खासगी साखर कारखान्यांद्वारे आणि २१० लाख क्विंटल नऊ सहकारी साखर कारखान्यांद्वारे गाळप केले जाणार आहे. या गळीत हंगामात पंजाबमध्ये ६२ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन अपेक्षित आहे. दोआबा किसान समितीचे अध्यक्ष जंगवीर सिंग चौहान म्हणाले की, त्यांनी प्रती क्विंटल एसएपी ४५० रुपये मागितले असले तरी पंजाबमधील ऊस उत्पादकांना सर्वाधिक भाव दिल्याचा आनंद आहे.