सातारा : कोल्हापुरात ऊस दराचा तिढा सुटला असताना सांगलीप्रमाणे साताऱ्यात मात्र ऊस दराचे घोंगडे भिजतच राहिले आहे. कोल्हापुरातील कारखानदारांना जमते, मग साताऱ्यात का होत नाही? असा सवाल शेतकऱ्यातून विचारला जात आहे. ऊस दरप्रश्नी शेतकरी संघटनां आक्रमक झाल्या आहेत. कोल्हापुरात मागील हंगामात उसाला प्रतिटन ३ हजारांपेक्षा जास्त दर देणाऱ्या कारखानदारांनी ५०, तर ३ हजारांपेक्षा कमी दर देणाऱ्या कारखानदारांनी गत हंगामातील १०० रुपये आणि यंदाच्या उसाला एफआरपी अधिक १०० रुपये देण्यास मान्यता दिली आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढलेले साखरेचे दर आणि इथेनॉल उत्पादन याचा सकारात्मक परिणाम देशातील साखर उद्योगावर झाला आहे. परंतु, यंदा पावसाअभावी साखर उत्पादनात घट होण्याचा अंदाज आहे. उत्पादनात घट झाल्यानंतर देशांतर्गत बाजारपेठेत साखरेला बऱ्यापैकी दर मिळण्याची शक्यता आहे. याचबरोबर इतर उपपदार्थांमधून साखर कारखान्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे.
कोल्हापुरातील कारखाने मागील पैसे व यंदाची एफआरपी अधिक १०० रुपये देऊ शकतात. तर साताऱ्यातील कारखानदारांनाही हे शक्य आहे. शेतकऱ्यांमध्ये संताप असून, लवकरच मोठे आंदोलन करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. यामध्ये प्रशासनानेही हस्तक्षेप करून या विषयावर तोडगा काढावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी केली.
कोल्हापूर व सांगलीतील कारखानदारांनी एफआरपी जाहीर केली आहे. साताऱ्यात मात्र कारखानदार गप्पच आहेत. दर जाहीर न करताच तोडी सुरू असल्याने शेतकरी संभ्रमात आहे. या प्रकरणात आता जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक बोलावून कारखानदारांची कानउघडणी करावी, असे मत भारत राष्ट्र समितीचे शंकरराव गोडसे यांनी व्यक्त केले.