राज्यात साखर कारखान्यांकडे शेतकर्‍यांची ११ हजार कोटींची थकबाकी

शामली : राज्यातील गाळप हंगाम समाप्त झाला आहे. राज्यातील साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे ११ हजार कोटी रुपये थकीत आहेत. तर शामली जिल्ह्यात ८०० कोटी रुपयांची थकबाकी आहे. कोरोनाच्या कर्फ्यूमुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. शेतकरी नेते राजन जावला यांनी सांगितले की, चौदा दिवसांत शेतकऱ्यांना पैसे देण्याचे आश्वासन फोल ठरत आहे. शेतकऱ्यांना उसाचे पैसे मिळत नसल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. यासोबतच मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून कारखान्यांवर कारवाई आणि ऊसाचे पैसे गतीने देण्याची मागणी केली.

जावला यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की १२ मे पर्यंत राज्यात एकूण उसाचे ३२,३४८.६६ कोटी रुपये देणे होते. चौदा दिवसांच्या नियमांनुार ३१,४८७.७५ कोटी रुपये देणे बंधनकारक होते. त्यापैकी १८,६१५.०५ कोटी रुपये १२ मे पर्यंत देण्यात आले आहेत. त्यानंतर ११,८७२.७० कोटी रुपये साखर कारखान्यांकडे थकीत आहेत.

गेल्या वर्षी देशात ६० लाख टन साखरेची निर्यात झाली आहे. त्यात सर्वाधिक वाटा राज्याचा आहे. महाराष्ट्राच्या दुप्पट उत्पादन राज्यात होते. मात्र, एवढे मोठे आर्थिक योगदान असूनही परिस्थिती चिंताजनक आहे. साखर निर्यात आणि देशांतर्गत बाजारपेठेत पैसे मिळूनही शेतकऱ्यांना वेळेवर पैसे मिळत नसल्याची स्थिती आहे. राज्यातील ४० लाख शेतकऱ्यांनी निर्यात वाढविण्यात आपले योगदान दिले आहे. मात्र, कारखान्यांकडून त्यांची उपेक्षा होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here