बदायूं : जिल्ह्यातील आठ साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांच्या उसाची १२९ कोटी रुपयांची थकबाकी आहे. होळीच्या सणापूर्वी उसाची थकीत रक्कम मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. कारखान्यांकडून पैसे देण्यास टाळाटाळ होत असल्याची भावना शेतकऱ्यांची आहे. ऊस विभागाच्या अधिकाऱ्यांनीही सर्व साखर कारखान्यांना शेतकऱ्यांची देणी देण्याबाबत पत्र पाठवून निर्देश दिले आहेत.
जिल्ह्यात ६० हजार शेतकरी १८ हजार एकर जमिनीवर ऊस शेती करतात. यापैकी २६ हजार शेतकरी साखर कारखान्यांना उसाचा पुरवठा करतात. सद्यस्थितीत किसान सहकारी साखर कारखाना शेखुपुर, यदू साखर कारखाना बिसौली, रजपूरा, न्यौली, फरीदपूर, करीमगंज, वीनस, बिलारी हे कारखाने ८१ ऊस खरेदी केंद्रांवरून शेतकऱ्यांचा ऊस घेतात.
आतापर्यंत जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी १७१ कोटी ४९ लाख ७९ हजार रुपये किंमतीचा ५३.४५ लाख टन ऊस खरेदी केला आहे. मात्र कारखान्यांनी फक्त ४१ कोटी ८५ लाख ७९ हजार रुपये शेतकऱ्यांना दिले आहेत. उर्वरीत १२९ कोटी ६३ लाख ७९ हजार रुपये थकीत आहेत. एकूण २४.४१ टक्के पैसेच शेतकऱ्यांना मिळाले आहेत. पैशांसाठी शेतकरी कारखान्यांच्या चकरा मारत आहेत. मात्र दुर्लक्ष केले जात आहे.
होळीचा सण जवळ आल्याने त्यापूर्वी पैसे मिळावेत अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. या सणावेळी जास्त पैसे खर्च होतात. कारखान्यांनी ऊस बिल दिले तर सण चांगल्या पद्धतीने साजरा करता येईल असे ऊस उत्पादक दुर्गपाल यांनी सांगितले.
भारतीय किसान युनीयननेही शेतकऱ्यांच्या थकबाकीचा प्रश्न उपस्थित केला आहे. भाकीयूचे नेते नरेश पाल सिंह राठोड यांनी सांगितले की लवकर पैसे दिले नाहीत तर आंदोलन सुरू केले जाईल. दरम्यान काही कारखान्यांचे गाळप पूर्ण झाले आहे. तर काही कारखान्यांचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे. सरकारच्या निकषानुसार ऊस खरेदी केल्यानंतर चौदा दिवसांत उसाचे पैसे शेतकऱ्यांना देणे बंधनकारक आहे.
दरम्यान, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पैसे लवकर मिळावेत यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सर्व कारखान्यांच्या व्यवस्थापकांशी चर्चा सुरू आहे. त्यांच्याशी पत्रव्यवहारही केला आहे. टाळाटाळ करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई केली जाईल असे जिल्हा ऊस अधिकारी रामकिशन यांनी सांगितले.