कोल्हापूर : साखर कारखान्यांकडून एकरकमी प्रतिटन ३२०० रुपयांचा दर आणि त्या पटीत गुळाला मिळणारा कमी दर यामुळे यंदा गुळ उत्पादनांत घट झाली आहे. कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत यंदाच्या हंगामात गुळाची आवक गेल्या आर्थिक वर्षापेक्षा २०२३-२४ मध्ये १० हजार रव्यांनी कमी झाली आहे. गुळाला सरासरी ३६०० रुपये क्विंटलपर्यंत दर राहिला. चार हजार रुपये खर्च करून तयार केलेला एक क्विंटल गूळ ३६०० रुपयांना विक्री करावा लागल्याचा परिणामही आवकेवर दिसतो. गुळाच्या दरात सातत्याने होणाऱ्या चढ-उताराने शेतकरी हैराण झाले आहेत. त्यामुळे यंदा अनेक शेतकऱ्यांनी गुऱ्हाळाऐवजी साखर कारखान्यांना पसंती दिल्याचे पाहायला मिळत आहे.
गुऱ्हाळ घरांसाठी मजुरांची वाणवा, साखर कारखान्यांमधील ऊस दराची चढाओढ आणि गुळाच्या उत्पादन खर्चाच्या तुलनेत मिळत असलेला दर यामुळे गुऱ्हाळघरांची संख्या कमी होत आहे. सध्या जिल्ह्यात जेमतेम दोनशे गुऱ्हाळघरे आहेत. सुमारे सात – आठ वर्षांपूर्वी समितीत वर्षाला २७ ते ३० लाख गूळ रव्यांची आवक व्हायची. मात्र, आता ती हळूहळू कमी होत आली आहे. यंदा साखर कारखान्यांनी प्रती टन ३ हजार ते ३२०० रुपयांपर्यंत पहिली उचल जाहीर करून हंगाम सुरू केला. त्यामुळे शेतकऱ्यांनी ऊस कारखान्याला पाठवल्याचे दिसते. गुळाचा उत्पादन खर्चावर दर मिळत नाही आणि शेतकऱ्यांना त्यापेक्षा साखर कारखान्यांकडून जादा पैसे मिळत असल्याने मानसिकता बदलली आहे. यंदा दहा हजार रव्यांनी आवक कमी झाली आहे, असे बाजार समितीचे उपसचिव के. बी. पाटील यांनी सांगितले.