शहजादपूर : ऊस थकबाकीचे १०५ कोटी रुपये त्वरीत मिळावेत या मागणीसाठी मंगळवारी संतप्त शेतकऱ्यांनी निदर्शने केली. भारतीय किसान युनीयनच्या बॅनरखाली बनोंदी साखर कारखान्यासमोर एकत्र आलेल्या शेतकऱ्यांनी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
कारखाना प्रशासनाने पैसे देण्यास टाळाटाळ चालविली असल्याचा आरोप शेतकऱ्यांचा आहे. सातव्यांदा शेतकऱ्यांनी पंचायतीचे आयोजन केले. कारखाना प्रशासनाने दिलेले एकही आश्वासन पाळलेले नाही. पैसे न मिळाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. जर कारखाना प्रशासनाने लवकर यातून मार्ग काढला नाही तर कारखाना ताब्यात घ्यावा लागेल असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला.
आंदोलनस्थळी भाकियूचे युवा प्रदेशाध्यक्ष रवि आझाद यांनी कारखाना आणि नारायणगड प्रशासनाला इशारा दिला. गेली २५ वर्षे कारखाना सुरू आहे. मात्र, स्थिती जैसे थे आहे. यापूर्वी मी दोनदा स्थानिक शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी झाला. मात्र, थकबाकी वाढतच चालल्याचे रवि आझाद म्हणाले.
विभाग प्रमुख बलदेव सिंह म्हणाले, १० मार्च रोजी शेतकऱ्यांची थकबाकी १०१ कोटी रुपये होती. २२ मार्च रोजी ती १०२ कोटी रुपये झाली आहे. तर आता ही रक्कम वाढून १०५ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. कारखाना प्रशासन पैसे दिल्याचा नुसता दावा करीत आहे.
साखर विक्री न झाल्याचे म्हणणे
साखर कारखान्याच्यावतीने आंदोलनस्थळी आलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी नरेंद्र मलिक यांनी नेहमीप्रमाणे साखर विक्री न झाल्याचे कारण पुढे केले. ते म्हणाले, आमच्याकडे जी साखर शिल्लक आहे, त्याची विक्री होत नाही. साखर विक्री आणि इतर ठिकाणाहून ५३ कोटी रुपये जमा होणार आहेत. १० एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांना १८ कोटी रुपये तर २० एप्रिलपर्यंत आणखी १७ कोटी रुपये असे एकूण ३५ कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले जातील असे आश्वासन त्यांनी दिले. शेतकरी नेते रवि आझाद यांनी जर दहा एप्रिलपर्यंत पैसे मिळाले नाहीत, तर १२ एप्रिलला आंदोलन सुरू केले जाईल असे जाहीर केले. यावेळी जिल्हा प्रमुख जसमेर सैनी, अवतार सिंह, बेरखेडी, ऋषी पाल, बिबीपूर, सतीश गणोली आदी उपस्थित होते.