नांदेड : भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या यंत्रणेवर आता वेळेत ऊसतोड करण्यासाठी मोठा दबाव आला आहे. काही शेतकऱ्यांनी अध्यक्षांच्या दालनात धडक मारत उसतोड कार्यक्रमात पक्षपातीपणा चालल्याचा आरोप केला आहे. यंदाच्या गाळप हंगामात ‘भाऊराव चव्हाण’च्या दोन प्रकल्पांत आतापर्यंत ४ लाख ६५ हजार मे. टन उसाचे गाळप झाले. पण सप्टेंबर २०२२ मध्ये लागवड झालेल्या उसाचे गाळप पूर्ण होऊ न शकल्यामुळे आता अनेक शेतकरी संचालक मंडळाकडे धाव घेत आहेत.
सप्टेंबर २०२२ मध्ये कार्यक्षेत्रात १७०० हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड अपेक्षित होती, पण तब्बल ४२०० हेक्टरवर लागवड झाल्यामुळे उसतोडीचे नियोजन काहीसे फिस्कटले आहे. असे असले तरी पुढील सव्वा दोन महिन्यांत कार्यक्षेत्रातील संपूर्ण उसाचे गाळप होईल, कुठल्याही शेतकऱ्याचा ऊस शिल्लक राहणार नाही, असे कार्यकारी संचालक श्यामराव पाटील यांनी स्पष्ट केले.
नांदेड विभागात मांजरा साखर उद्योग समूह अनेक कारखान्यांचे व्यवस्थापन चोखपणे पार पाडत असताना, चार प्रकल्पांवरून दोनवर आलेल्या ‘भाऊराव चव्हाण’ला यंदा काटेकोर नियोजन का करता आले नाही, असा सवाल बारडच्या प्रा. संदीपकुमार देशमुख यांनी केला आहे.यंदाचे वर्ष लोकसभा निवडणुकीचे असल्यामुळे गाळप हंगामादरम्यान ऊस उत्पादकांना कोठेही त्रास होणार नाही, याची खबरदारी घ्या असा कानमंत्र कारखान्याचे संस्थापक अशोक चव्हाण यांनी कारभाऱ्यांना दिला होता; पण कारखान्याच्या शेती समितीचे अध्यक्ष आणि त्यांच्या अधिपत्याखालील ऊस तोड नियोजन यंत्रणा अपुरी ठरत असल्याचे सांगितले जात आहे.