शेतकऱ्याचा विक्रम… एकरी घेतले १३७ टन ऊस उत्पादन

पुणे : माळेगाव साखर कारखान्याचे सभासद आणि पणदरे-सोनकसवाडी येथील शेतकरी संजय यशवंत जगताप यांनी चालू हंगामामध्ये उसाचे एकरी १३७ टन उत्पादन घेतले आहे. जगताप यांनी यापूर्वीचे शंभर टन प्रती एकर उत्पादनाचा विक्रम मोडीत काढला आहे. साखर कारखान्याच्या ऊस विभागाने ही माहिती दिली आहे. कारखाना कार्यक्षेत्रात प्रयोगशिल ऊस उत्पादक शेतकरी एकरी ऊसाचे शंभर टन उत्पादन काढण्यासाठी स्पर्धा करतात. त्यात जगताप यांनी अव्वल स्थान पटकावले आहे. जगताप यांच्यामुळे राज्यातील अन्य शेतकऱ्यांना प्रेरणा मिळणार आहे.

माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा गाळप हंगाम १ नोव्हेंबर पासून सुरू झाला आहे. यंदा पावसाने दडी मारल्याने ऊस टंचाईची स्थिती आहे. मात्र, प्रयोगशील शेतकरी उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करीत आहेत. पणदरे-सोनकसवाडी (ता. बारामती) येथील शेतकरी संजय जगताप यांनी को. ८६०३२ जातीच्या उसाचे उत्पन्न एकरी १३७ टन ६०० किलो इतके घेतले आहे. जगताप यांच्या गट क्रमांक ३१९ मधील ऊसाची तोडणी २ ते ११ नोव्हेंबर या कालावधीत करण्यात आली. त्यातून जगताप यांनी केलेला ऊस उत्पादन वाढीचा विक्रम समोर आला.

कारखान्याचे ऊस विकास अधिकारी सुरेश काळे यांनी सांगितले की, जगताप यांनी केलेला हा विक्रम इतर ऊस उत्पादकांसाठी दिशादर्शक ठरणारा आहे. जगताप यांनी विक्रमी उत्पादन घेतल्याचे समजताच माळेगावच्या कार्यक्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला. कारखान्याचे अध्यक्ष अॅड. केशवराव जगताप, उपाध्यक्ष तानाजी देवकाते, संचालक योगेश जगताप, कार्य़कारी संचालक अशोकराव पाटील आदींनी त्यांचे अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here