विटा : यंदा एकीकडे अतिवृष्टी आणि एकीकडे दुष्काळ यामुळे शेतकर्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मोठ्या प्रामाणात ऊस पाण्याखाली गेला आहे. त्यातच साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाची सुरुवात होत आहे. पण अद्यापही एकाही कारखान्याने ऊसाचा दर जाहीर केलेला नाही. नुकसान झाल्याने निराश झालेल्या शेतकर्यांना ऊस दर जाहीर करुन दिलासा द्यावा, असे मत खानापूर कडेगाव शेतकरी कामगार पक्षाचे चिटणीस सुभाष पाटील यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, दरवर्षी ऊस पिकवणारा शेतकरी अडचणीत येतो आहे. त्याला संघर्ष करावा लागत आहे. ही परिस्थिती बरोबर नाही.
गेल्या हंगामात गाळप केलेल्या ऊसाचे पैसेही काही कारखान्यांनी दिलेले नाहीत. त्यांनी हे पैसे शेतकर्यांना द्यावेत. अशा अवस्थेत शेतकर्यांची बाजू घेणार्या संघटनांना संघर्षाशिवाय पर्याय राहात नाही. ते म्हणालेे, सर्वच कारखानादारांनी गव्हाणीत मोळी टाकून गळीत हंगामाचा प्रारंभ मोठ्या धुमधडाक्यात सुरु करण्याचा धडाका लावला आहे. चालू वर्षी ऊसाची उपलब्धता अत्यंत कमी आहे. हंगामही जेमतेम तीन महिने चालेल असा अंदाज आहे. त्यामुळे कमी साखर उत्पादनामुळे साखरेची टंचाई निर्माण होणे साहजिकच आहे. अशा परिस्थितीत ऊस दराचा प्रश्न सोडवून शेतकर्यांना दिलासा द्यावा, अन्यथा संघर्ष अटळ आहे, असा इशाराही त्यांनी दिला.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.