शेतकऱ्यांनी गाळपासाठी ऊस पाठवण्याची घाई करू नये : माजी खासदार राजू शेट्टी

बेळगाव : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले कि, यंदा पाऊस कमी झाल्याने एकरी दहा ते बारा टनाने उत्पादन घटणार आहे. कोल्हापूर, सांगली व बेळगाव जिल्ह्यातील साखर कारखाने जेमतेम सुमारे तीन महिने चालतील. कर्नाटकातील साखर कारखान्यांकडून महाराष्ट्रातील उसाची पळवापळवी होणार आहे. त्याशिवाय कारखान्यांनी गाळप क्षमता वाढवली आहे. त्यामुळे यंदाचा हंगाम हा शेतकऱ्यांना लाभदायक होणार आहे. तरी उस दर निश्चित झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी ऊस कारखान्यास पाठवण्यास घाई करू नये, असे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले.

१३ सप्टेंबरच्या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन

बेळगाव जिल्ह्यातील बोरगाव येथे आयोजित निर्धार सभेत ते बोलत होते. शेट्टी म्हणाले, जागतिक बाजारपेठेत साखरेचे दर प्रतिक्विंटल ३५०० रुपयांच्या पुढे गेले आहेत. त्यामुळे साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रतिटन ४०० रुपये जमा करावेत. यासाठी १३ सप्टेंबरला कोल्हापूर येथील साखर आयुक्त कार्यालयावर मोर्चाचे आयोजन केले आहे. त्यामध्ये महाराष्ट्रसह कर्नाटक सीमाभागातील शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले.

साखर कारखान्याला ६०० ते ८०० रुपये ज्यादा मिळतात

शेट्टी म्हणाले, बेळगाव जिल्ह्यातील अनेक साखर कारखाने एफआरपीप्रमाणे दर टाळाटाळ करीत आहे. याबाबत साखर आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे. गळीत हंगाम सुरू झाला तेव्हा साखरेचा दर ३१०० रुपये होता. आता ३७०० ते ३९०० रुपये झाला आहे. सरासरी ३६०० दर गृहीत धरले तरी साखर कारखान्याला ६०० ते ८०० रुपये ज्यादा मिळतात. कृषी आयोगाच्या शिफारशीनुसार कारखान्यात उत्पादित होणारे इथेनॉल, ट्रान्स्पोर्ट, वीजनिर्मिती या अंदाजावरून कारखान्यांनी एफआरपी देणे बंधनकारक आहे. मात्र, असे होत नसल्याने ऊस उत्पादकांना नुकसान सोसावे लागत आहे.

सभेस बाबूराव पाटील, भरमू चिमूड, सावकर मादनाईक, अजित पुजारी, रामचंद्र फिरगनवर, काशाप्पा जम्बोगी, बंडू पाटील, बंडू बोधले, तात्यासाहेब वसन्नावर, रमेश मालगावे, राजू फिरंगणवर, प्रदीप माळी, अनिल चौगुले, तात्यासाहेब केस्ते, प्रकाश तारदाळे, अभय पाटील, शांतिनाथ कैस्ते, महावीर उदगावे, पिरगोंडा चौगुले यांच्यासह बोरगाव, बेडकीहाळ, सदलगा, जनवाड, गळतगासह सीमा भागातील ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here