सातारा : अजिंक्यतारा कारखान्याने शेतकऱ्यांचा ऊस वेळेत नेण्यासाठी आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य नियोजन केले आहे. शेतकऱ्यांनी आपला ऊस दुसऱ्या कारखान्यांना न पाठवता या कारखान्याकडेच पाठवावा, असे आवाहन कारखान्याचे माजी चेअरमन सर्जेराव सावंत यांनी केले. लिंब सोसायटीमध्ये आयोजित बैठकीत ते बोलत होते.
शेतकऱ्यांनी कारखाना प्रशासनाने ऊस तोडीत दुजाभाव करू नये अशी मागणी केली. शेतकऱ्यांचा ऊस वेळेत तोडल्यास दुसऱ्या कारखान्याला ऊस जाणार नाही. मोठे शेतकरी ऊस जर दुसऱ्या कारखान्याला घालत असतील तर छोटे शेतकरीही ऊस दुसऱ्या कारखान्याला घालतात, ही वस्तुस्थिती आहे. यासाठी कारखान्यावरील अधिकाऱ्यांनी प्रोग्रामनुसारच ऊस तोडावा, अशी मागणी केली.
यावेळी व्हाईस चेअरमन नामदेव सावंत, संचालक डॉ. शशिकांत साळुंखे, नितीन पाटील, कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते, सरपंच ॲड. अनिल सोनमळे, उपसरपंच रवींद्र शिंदे, सोसायटीचे चेअरमन प्रदीप पाटील, व्हा. चेअरमन तानाजी वर्णेकर आदी उपस्थित होते. बैठकीस लिंब, गोवे व वनगळ परिसरातील शेतकरी उपस्थित होते.