थकीत ऊस बिलप्रश्नी टोकाई कारखाना अध्यक्षांच्या घरासमोर शेतकऱ्यांचा ठिय्या

वसमत : तालुक्यातील टोकाई सहकारी साखर कारखाना डबघाईला आला आहे. यंदा कारखान्याने २५ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून, चालू हंगामातील कारखान्याकडे ४ कोटी रुपयांवर ऊस बिल थकले आहे. एकूण ९ कोटी रुपयांवर ‘एफआरपी’ थकीत आहे. कारखान्यावर ‘आरआरसी’ची कारवाई करण्यात आली आहे. सध्या हा कारखाना जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात आहे. यांदरम्यान, कारखान्याचे अध्यक्ष आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल केलेले अॅड. शिवाजी जाधव यांच्या घरासमोर शुक्रवारी तब्बल चार तास शेतकऱ्यांनी आक्रोश आंदोलन केले.

‘टोकाई’चे अध्यक्ष अॅड. शिवाजी जाधव वसमतला आल्याचे कळताच ऊस बिलांच्या मागणीसाठी ५ एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता शेतकरी अध्यक्षांच्या घरी पोहोचले. यावेळी विविध मागण्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी घरासमोर मांडल्या. दरम्यान, शेतकरी घरी येणार असल्याची माहिती अध्यक्षांना मिळताच त्यांनी घरून काढता पाय घेतला. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी त्यांच्या घरासमोर चार तास आक्रोश केला. तुम्ही लोकसभा निवडणूक लढवा की तिकडे काही करा, अगोदर शेतकऱ्यांचे थकीत बिल द्या अशी मागणी केली. दरम्यान, कारखान्यावर ‘आरआरसीची कारवाई झाली आहे. मशिनरी विक्रीच्या निविदा काढल्या आहेत. कारवाई पूर्ण होताच शेतकऱ्यांच्या थकीत रकमा दिल्या जातील असे अध्यक्ष अॅड. शिवाजी जाधव यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here