पंजाब : थकीत ऊस बिलांसाठी शेतकऱ्यांचे आमदारांना निवेदन

अमृतसर : पंजाबमध्ये संयुक्त किसान मोर्चाअंतर्गत सर्व १६ शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी जिल्ह्यातील सर्व ११ आमदारांना ऊस थकबाकीसह आपल्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत निवेदन दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, आम आदमी पक्षाच्या नऊ आमदारांसह काँग्रेस आणि शिरोमणी अकाली दलाच्या आमदारांनाही निवेदन देण्यात आले आहे. शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ आमदारांच्या कार्यालय तसेच घरी पोहोचल्यानंतर बहुसंख्य ठिकाणी त्यांचे खासगी स्वीय सहाय्यक आणि कुटुंबातील सदस्यांनी निवेदन स्वीकारले. अमृतसर दक्षिणचे आमदार इंद्रबीर सिंह निज्जर आणि अटारीचे आमदार जसविंदर सिंह यांनी व्यक्तीशः हे निवेदन स्वीकारले. आमदार निज्जर यांनी आमच्या सर्व मागण्या ऐकून घेतल्या आणि याबाबत सरकारकडे बाजू मांडली जाईल असे आश्वासन त्यांनी दिल्याचे शेतकरी नेत्यांनी सांगितले.

ट्रिब्यून इंडियामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, जम्हूरी किसान सभेचे शेतकरी नेते डॉ. सतनाम सिंह अजनाला, सीमा क्षेत्र संघर्ष समितीचे रतन सिंह रंधावा आणि कीर्ति शेतकरी संघाचे जतिंदर सिंह चिन्ना यांनी सांगितले की, प्रमुख मागण्यांमध्ये शेतकऱ्यांच्या ऊस बिलांची थकबाकी त्वरीत देण्याचा विषय आहे. अजनाला यांनी सांगितलेकी, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सुमारे ९०० कोटी रुपये थकीत आहेत. सरकारने राज्यात भात रोपण सुरू करण्याची तारीख वाढवावी, अशी विनंती त्यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here