शेतकरी संघटना कारखानदारांची मस्ती उतरवल्याशिवाय गप्प बसणार नाहीत : माजी खासदार राजू शेट्टी

कोल्हापूर : साखर कारखानदार ऊस दराबाबत गांभिर्याने दखल घेत नसतील तर कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी संघटना कारखानदारांची मस्ती उतरवल्याशिवाय गप्प बसणार नाहीत. ऊसदराच्या बैठकीला साखर कारखान्याच्या कामगारांना पाठवणाऱ्यांचा कारखानदारांना हा आमचा शेवटचा इशारा असल्याचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले. सोमवारी (ता.०९) जिल्हाधिकारी कार्यालयात साखर कारखानदार, प्रशासन आणि शेतकरी संघटना यांची बैठक बोलवण्यात आली, परंतु या बैठकीत कोणताही तोडगा न निघाल्याने सर्वच शेतकरी संघटना आक्रमक झाल्या. यावेळी शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह विविध शेतकरी संघटनांनी साखर कारखानदारांच्या चेअरमन आणि संचालकांना निर्वाणीचा इशारा दिला.

गळीत हंगाम २०२३ -२४ मधील ऊस दरातील फरक व चालू हंगामातील पहिली उचल प्रतिटन ३ हजार ७०० रुपये मिळावी, या मागणीसाठी विविध शेतकरी संघटना आंदोलन करत आहेत. या पार्श्वभूमीवर साखर कारखानदार, शेतकरी संघटना यांची बैठक सोमवारी (ता. ९) सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली होती. यावेळी साखर कारखान्यांचे अध्यक्ष, कार्यकारी संचालक आलेच नसल्याने शेतकरी संघटनांचे नेते संतापले. त्यांनी बैठकीमध्ये प्रशासन आणि कारखानदार यांचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली. अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे म्हणाले की, शेतकरी संघटना आणि राजू शेट्टी यांच्या म्हणण्यानुसार आम्ही आजची बैठक स्थगित करत आहोत. पुढच्या दोन दिवसात साखर कारखान्यांच्या चेअरमन आणि संचालकांना पुन्हा नोटीस काढण्यात येईल. यानंतर पुढच्या बैठकीबाबत सर्वांना कळवण्यात येईल.

माजी खासदार शेट्टी म्हणाले, कित्येक दिवसांपासून दराबाबत आंदोलन सुरू असुनही कारखानदार बैठकीला येत नसतील तर त्यांची मस्ती जिरवल्याशिवाय शांत बसणार नाही. या बैठकीला उसाचा दर ठरवण्याचा अधिकार नाही त्या कामगारांना पाठवून देत असतील तर जिल्ह्यातील सर्व शेतकरी संघटना मिळून कारखानदारांचा माज उतरवल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे शेट्टी म्हणाले. आंदोलन अंकुश संघटनेचे धनाजी चुडमुंगे म्हणाले की, मागच्या दोन महिन्यांपासून शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यात ऊस दराबाबत आंदोलन सुरू आहे. १५ दिवस अन्नत्याग आंदोलन केले परंतु कारखानदारांनी यावर बैठक बोलवून तोडगा काढू असा निर्णय दिला. याचबरोबर किसान सभा, जय शिवराय संघटना, भारतीय किसान मोर्चा या शेतकरी संघटनांनी आपले म्हणणे मांडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here