संगरुर : सरकारने जर धुरी साखर कारखान्याकडील थकीत ६ कोटी रुपये जर १० डिसेंबरपूर्वी दिले नाहीत, तर आंदोलन सुरू करण्याचा इशारा ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी दिला आहे.
दि ट्रिब्यूनमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, ऊस उत्पादक संघर्ष समितीचे अध्यक्ष हरजीत सिंह बुगरा यांनी सांगितले की, आम्ही कारखाना प्रशासनाकडून ६ कोटी रुपयांची थकबाकी मिळण्याची प्रतीक्षा करीत आहोत. आमचे पैसे मार्चपर्यंत मिळणे अपेक्षित होते, कारण ऊस हंगाम फेब्रुवारी महिन्यात समाप्त झाला. धुरी येथे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर शेतकरी धरणे आंदोलन करीत होते. मात्र, लवकर पैसे देण्याच्या राज्य सरकारच्या आश्वासनानंतर हे आंदोलन थांबविण्यात आले.
आंदोलकांनी आरोप केला की, कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी २१ नोव्हेंबर रोजी २४ लाख रुपये जारी केले, मात्र त्यानंतर एक रुपयाही देण्यात आलेला नाही. बुगरा यांनी सांगितले की, सरकारने १० डिसेंबरपूर्वी थकीत बिलांना मंजुरी दिली जाईल,0 असे आश्वासन आम्हाला दिले आहे. जर प्रशासन यामध्ये अपयशी ठरले तर आम्ही विरोधात आंदोलन सुरू करू. धुरीचे उप जिल्हाधिकारी अमित गुप्ता यांनी सांगितले की, ऊस उत्पादकांना बिले देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.