सांगली : शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील, तर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्त करा, अशी मागणी शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी केली. तसेच, शेतकरी विरोधी कायदे न बदलल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही या वेळी देण्यात आला.
सांगलीतील कल्पतरू मंगल कार्यालयात गुरुवारी (ता. १२) शेतकरी नेते शरद जोशी व हुतात्मा बाबू गेनू यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शेतकरी हुतात्मा स्मृती परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
या वेळी रघुनाथदादा पाटील म्हणाले, गतवर्षी देशात तीन लाख ९८ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या
केल्या आहेत. शेतीमालाला भाव मिळत नसल्याने आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. वाढती महागाई आणि कायम राहिलेला कर्जाचा बोजा यामुळे शेतकरी पिचून गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी दिल्याशिवाय पर्याय नाही. गुजरातमधील कारखान्यांनी दोन वर्षांपूर्वीच उसाला ४७०० रुपये दर दिला. उत्तर प्रदेशात यंदाची एसएपी ३२५० रुपये
आहे. हे पाहता राज्यातील शेतकऱ्यांचा तोटा होत आहे. दोन कारखान्यांतील अंतराची अट काढून टाकायला हवी. केंद्र आणि राज्यात भाजप सत्तेत असतानाही शक्य झाले नाही. टनाला ४ हजार दर मिळाला नाही, तर चालू झालेले कारखाने आम्ही बंद
पाडू.
या वेळी पुणे विचारवेधचे आनंद करंदीकर, शिवाजीराव नांदखिले यांची हि भाषणे झाली. कालिदास आपेट,धनंजय ठाकडे, बंडा सोळंकी, अजित काळे, गणेश घुगे ,जिल्हाध्यक्ष हणमंतराव पाटील, महादेव कोरे, डी. जी. माळी, रावसाहेब ऐतवडे, वंदना माळी यांच्यासह राज्यातील पदाधिकारी, शेतकरी या वेळी उपस्थित होते.
परिषदेतील प्रमुख ठराव…
• सरसकट कर्ज, वीजबिल माफी करावी.
• शेतकरी विरोधी कायदे रद्द करावेत.
• शेतीमालावरील निर्यातबंदी उठवावी.
• उसाला प्रतिटन चार हजार रुपये दर द्यावा.
• गायीच्या दुधाला ४०, तर म्हैशीच्या दुधाला ६० रुपये
दर मिळावा
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.