नवी दिल्ली : घातक कोरोना व्हायरसच्या संक्रमणाशी लढताना भारतीय बँक संघाने (आयबीए) बँकांना आपले कामाचे तास कमी करण्याचे आवाहन केले आहे. सकाळी दहा वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंतच बँकिंग कामकाज केले जावे अशी सूचना केली आहे. याबाबत मिंटने एका पत्राच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.
आयबीएने २१ एप्रिल रोजी राज्यस्तरीय बँकिंग समितीच्या प्रमुखांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की आम्ही म्युटेंट व्हायरसच्या प्रकोपामुळे आव्हानात्मक परिस्थितीतून जात आहोत. त्यामुळे अनेक राज्यांत दररोज संक्रमणाचे मोठे आकडे दिसून येत आहेत. त्यामुळे आर्थिक व्यवहारांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. आयबीएने २१ एप्रिल रोजी एक विशेष प्रबंध समितीची खास बैठक घेऊन गेल्यावर्षीच्या एसओपीमधील नियमांबाबत चर्चा केली. यासंदर्भात काही विशेष पाऊल उचलण्याचाही निर्णय घेतला.
गेल्यावर्षीच्या कोरोनाच्या परिस्थितीच्या तुलनेत आता कोरोनाची साखळी तोडण्यासाठी निर्देश जारी केले आहेत. बँकंना विविध राज्यांत आणि जिल्ह्यांत विविध नियमांचे पालन करावे लागत आहे. बँकांमध्ये पैसे जमा करणे, पैसे काढले, ट्रान्सफर आणि सरकारी व्यवहार या चार सेवा अनिवार्य आहेत. प्रत्येरक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाने एसएलबीसीमध्ये आपल्या स्थितीचे समिक्षण करावे. अतिरिक्त सेवांबाबत त्यानंतर निर्णय घेतला जाईल.
बँकांमध्ये कर्मचाऱ्यांना रोटेशन पद्धतीने कामावर बोलावले जाऊ शकते. ते घरातून काम करू शकतात. आदर्श स्वरुपात ५० टक्के कर्मचाऱ्यांना वैयक्तिक कामावर बोलवावे अथवा रोटेशन पद्धत वापरण्याची सूचना देण्यात आली आहे. आयबीएने एसएलबीसीच्या मुख्य आरोग्य अधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना संपर्क साधण्यास सांगितले आहे. कर्मचाऱ्यांना सामूहीक अथवा वैयक्तिक स्तरावर लसीकरण करून घेण्यास सांगण्यात आले आहे.
डोअरस्टेप बँकिंग प्रक्रियेला गती देण्याच्या सूचना देण्यात आल्या असून बँकांना आपत्कालीन वैद्यकीय सुविधा मिळाव्यात असेही सुचविण्यात आले आहे.