विठ्ठलराव शिंदे कारखान्याकडून खोडवा उसासाठी शेतकऱ्यांना खत वाटप सुरू : चेअरमन, आमदार बबनराव शिंदे

सोलापूर : विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यामार्फत पिंपळनेर युनिट व करकंब युनिट कारखान्याकडे नोंदलेल्या खोडवा ऊस पिकाच्या संगोपनासाठी सभासद, शेतकऱ्यांना युरिया व दाणेदार १५:१५:१५ खताचे घरपोच वाटप सुरू करण्यात आले आहे. चालू हंगामात तुटलेल्या उसाचे खोडवा पीक चांगल्या पद्धतीने जोपासणे गरजेचे आहे. त्यासाठी कारखाना प्रयत्नशील आहे असे कारखान्याचे संस्थापक चेअरमन आ. बबनराव शिंदे यांनी दिली.

आ. शिंदे म्हणाले की, एकूण १४ कोटी रुपयांचे खत वाटप होणार आहे. चालू हंगामातील खोडवा ऊस पीक जोपासण्यासाठी व खरीप पिकांसाठी शेतकऱ्यांना रासायनिक खताची आवश्यकता भासणार आहे. याचा विचार करुन कारखाना व्यवस्थापनाने खोडवा ऊस पीक संवर्धनासाठी सभासद व ऊस पुरवठादारांना युरिया व १५:१५:१५ खताचे घरपोच वाटप करण्याचे नियोजन केले आहे. दोन्ही मिळून साधारणतः ११ हजार ८०० टन खत शेतकऱ्यांना दिले जाईल. आगामी गळीत हंगामासाठी गाळप क्षमतेएवढा ऊस उपलब्ध व्हावा व कारखान्याचे जास्तीत जास्त गाळप व्हावे यासाठी हे प्रयत्न आहेत. शेतकऱ्यांना कारखान्यामार्फत खोडवा ऊस पीक संगोपनासाठी पाचट व्यवस्थापन, खताची मात्रा, ठिबक या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात येत आहे. यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन वामनराव उबाळे, कार्यकारी संचालक संतोष दिग्रजे व विविध विभागांचे खातेप्रमुख, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here