जागतिक मंदीच्या झटक्याने जगभरातील लाखो नोकरदारांवर परिणाम झाला आहे. त्याचा परिणाम भारतातही झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक दिग्गज कंपन्यांसोबत काही स्टार्टअप्सनेही मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात केली आहे. अशा परिस्थितीत जागतिक मंदी असताना त्याचा भारतावर किती परिणाम झाला असा प्रश्न उपस्थित होत आहे. दुसरीकडे भारतीय कर्मचाऱ्यांमधील अनिश्चिततेमध्ये कर्मचारी भरती करणाऱ्या फर्म्सनी दिलासा दिला आहे.
एबीपी लाईव्हने दिलेल्या वृत्तानुसार, नव्या कर्मचारी भरती फर्मने असा दावा केला आहे की, जगाच्या तुलनेत भारतात खूप कमी कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागली आहे. जगात १०० जणांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, तर भारतात केवळ २ ते ३ कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन कमी करण्यात आले आहे असे इकॉनॉमिक टाइम्समध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तामध्ये म्हटले आहे. सर्वाधिक कामगार कपात टेक सर्व्हिस, स्टार्टअप्स, ई कॉमर्स कंपन्या, टेक एंटरप्रायजेस मध्ये झाली आहे. जगातील एकूण कामगार कपातीत २०२२ मध्ये एकूण ११ टक्के भारतीय कर्मचाऱ्यांवर परिणाम झाला होता. तर यंदा हा आकडा ४ टक्के इतका आहे.