लातूर : गेली दहा वर्षे बंद पडलेल्या मारुती साखर कारखान्याने माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तीन वर्षात सर्वाधिक दर देण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे. कारखान्याने अवघ्या २५ दिवसांत ५० हजार मेट्रिक टन ऊस गाळप केले आहे. माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी दिलेल्या नव संजीवनीमुळे औसा तालुक्यातील मारुती कारखान्याने दरात आणि गाळपात मोठी झेप घेतली आहे.
सलग दहा वर्षे बेलकुंड येथील श्री संत शिरोमणी मारुती महाराज साखर कारखाना बंद होता. कर्जाचा डोंगर आणि संचालक मंडळाची अनास्था यामुळे साखर कारखाना बंद राहिला. स्व. विलासराव देशमुख यांच्यामुळे मिळालेल्या या साखर कारखान्याला नव्याने उभे करण्याचे काम देशमुख परिवाराने केले. तत्कालीन पालकमंत्री अमित देशमुख यांनी पाया रचला. दिलीपराव देशमुखांच्या दूरदृष्टीने आता कारखान्याने नवी झेप घेतली आहे.
बाराशे पन्नास मेट्रिक टन गाळप क्षमता असलेल्या या मारुती कारखान्याला अडीच हजार मेट्रिक टनाच्या क्षमतेत रुपांतरीत करण्यात आले आहे. यापूर्वी कारखान्याच्या इतिहासात २२५० रुपये एवढा सर्वाधिक अंतिम दर शेतकऱ्यांना मिळाला होता. मात्र सध्याच्या संचालक मंडळाने २०२०-२१ मध्ये अंतिम दर २३२३ रुपये, सन २०२१-२२ मध्ये अंतिम दर २५५५ आणि चालू हंगामात पहिली उचलच थेट २५०० रुपये जाहीर केली आहे. शेतकऱ्यांना दहा दिवसांत पहिली उचल देण्याचा पायंडा सलग तीन वर्षांपासून कायम ठेवला आहे.